गोंदिया: वनक्षेत्र चिचगड सहवनक्षेत्र पालांदूर अंतर्गत येणारे पालांदूर व टेकरी येथे बिबट्याचा संचार आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. वनविभागाने स्थानिक नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले. देवरीचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रशांत वडे यांनी सालवणकर, वनपाल पालांदूर तसेच सर्व क्षेत्रीय वनकर्मचारी यांच्यासह प्रत्यक्ष या गावी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामपंचायत मगरडोहचे सरपंच विलास भोगारे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. या बैठकीत प्रशांत वडे यांनी परिसरात बिबट प्राणी दिसल्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सावध राहण्याचे आणि सतर्कतेचे आवाहन केले. तसेच बिबट दिसताच तात्काळ जवळच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा कार्यालयाला कळविण्याच्या सूचना दिल्या. वनविभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वन्यप्राण्यां विषयी जागरूकता वाढून मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
रामनगर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
नवेगावबांध जवळील रामनगर, कडोली व प्रतापगड या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ असून, विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परिसरातील विद्यार्थी दिनकरनगर येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. या विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. याबाबतची माहिती त्यांनी शाळेला दिली. शाळेने विद्यार्थ्यांना इजा होऊ नये म्हणून वनविभागाला कळविले आहे. परंतु, वनविभागाने लक्ष दिले नसल्याचा आरोप होत आहे.
उल्लेखनीय म्हणजे, १ महिन्यापूर्वी ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या संजयनगर येथे बिबट्याने एका पाचवर्षीय मुलाचा बळी घेतला. त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ६-७ दिवसांचा कालावधी लागला. आता पुन्हा या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वाढलेला आहे. अनेक परिसरातील विद्यार्थी सुट्टी झाल्यानंतर स्वगावी जातात. सायंकाळची वेळ असते. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वनविभागाने दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरगाव चापटीत वाघाचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण;
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरगाव चापटी गावात वाघाच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाघ दररोज गावात शिरत असून जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वाघ दिसल्याची माहिती वारंवार वनविभागाला देण्यात आली असली तरी विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.शेतकऱ्यांना रात्री शेतावर जाण्यास भीती वाटत असून पशुपालक आपल्या जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी सतत सतर्क आहेत. गावातील लहान मुले व महिलादेखील घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने विशेष पथक पाठविणे, पिंजरा लावणे आणि गस्त वाढविणे या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाघाचा बंदोबस्त न झाल्यास नागरिकांच्या जीवितासह जनावरांच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सडक अर्जुनी तालुक्यात सीतापारमध्ये वाघ दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
सडक अर्जुनी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या पांढरी गावाला लागून असलेल्या सीतेपार/किशनपूर येथे ग्रामस्थ वाघ पाहत आहेत. यामुळे रहिवासी भीतीच्या छायेत राहत आहेत. ही दहशत इतकी तीव्र आहे की अंधार पडताच गावकऱ्यांना घरातच राहावे लागते. जिल्ह्यात वन्यजीवांकडून लोकांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सीतेपार/किशनपूर येथील ग्रामस्थही घाबरले आहेत. वन विभागाने वाघाला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी होत आहे जेणेकरून तो मुक्तपणे फिरत असताना कोणावरही हल्ला करू नये. हे गाव नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने गावात मोठ्या प्रमाणात वन्यजीव मुक्तपणे फिरताना दिसतात.वन्यजीवांची संख्या सातत्याने वाढत आहे.
तथापि, कमी होत चाललेल्या वनक्षेत्रामुळे, भक्षक वन्यजीव गावांकडे सरकत आहेत. शिवाय, हे वन्यजीव शेतीचेही नुकसान करत आहेत. तहसीलमधील पंढरीला लागून असलेला परिसर म्हणजे सीतेपार/किशनपूर गावात वाघ दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ मुक्तपणे फिरत आहे आणि अनेक ग्रामस्थांनी तो पाहिला आहे. ही माहिती कोसमतोंडी येथील क्षेत्र सहाय्यक कार्यालयाला कळवण्यात आली आहे.वन विभागाच्या पथकाने वाघाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. तथापि, वाघ आढळला नाही. परिसरात शोध घेतल्यावर वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले, ज्यामुळे रात्रीची गस्त वाढवण्यात आली.
वाघाच्या पावलांचे ठसे दिसले
वाघ दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक गावात पोहोचले. तपासात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले. रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. दोन-तीन ठिकाणी सापडे लावून पिंजऱ्यात वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. – एफ. सी. शेंडे, वनक्षेत्र सहायक, कोसमतोडी, गोंदिया