लोकसत्ता टीम

वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प वन्यजीव व मनुष्य यातील संघर्षाने नेहमी चर्चेत असतो. गावांचे पुनर्वसन करण्याची सातत्याने मागणी होते. मात्र अद्याप हालचाल नाहीच. त्यातूनच गुरुवारी रात्री घडलेली घटना गावकरी मंडळीचा रोष ओढविणारी ठरली.

सेलू तालुक्यातील हिवरा येथील असलेले एक शेतकरी सायंकाळी सात वाजता शेतात जात होते. तेव्हा गावाच्या लगत हाकेच्या अंतरावर नदीकाठी त्यांना वाघ असल्याचा भास झाला. हातातील टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी पाहणी सूरू केली. तेव्हा झुडपात बिबट दिसून आला. प्रकाश डोळ्यावर पडल्याने बिबट चवताळला. त्याने शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या शेतकऱ्याने हातातील पिशवी बिबटच्या दिशेने भिरकावली आणि गावाकडे धूम ठोकली. पण बिबट्यानेही हार नं मानता शेतकऱ्याचा पाठलाग सूरू केला.

आणखी वाचा-संघ पदाधिकाऱ्यांबरोबर फडणवीसांची चर्चा; चर्चेनंतर लगेच दिल्लीकडे रवाना

घाबरलेल्या त्या शेतकऱ्याने दगडफेक करीत कसेबसे बिबट्यास हाकलून लावले. बिबट आणि शेतकऱ्यात असे युद्ध रंगले असतांनाच बिबट्याच्या पिल्लाचा टाहो सूरू झाला. पळ काढलेल्या शेतकऱ्याच्या आवाजाने गावकरी जमा झालेत. बिबट पळून गेला असल्याने शेवटी उपस्थित गावाकऱ्यांनी त्या अनाथ पिल्लास ताब्यात घेतले. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, असा नेहमी अनुभव घेणाऱ्या गावाकऱ्यांनी भूतदया दाखवीत त्या पिल्लास सोबत नेत गावातील एका घरी सुरक्षित ठेवले.

काही काळ त्यास जोपासले. या घटनेची माहिती मिळाल्यावर दोन तासांनी वन विभागाचे कर्मचारी गावात पोहचले. तेव्हा गावाकऱ्यांच्या संतापास त्यांना सामोरे जावे लागले. उपस्थित शेतकऱ्यांनी मग त्यांच्यावर संताप व्यक्त केला. गावात बिबट व अन्य हिंस्त्र पशुचे हल्ले होत असतात. आता आम्हीच या प्राण्यांना ठार मारून टाकायचे का, असा सवाल करण्यात आला. मात्र कर्मचारी निरुत्तर होते. कसेबसे त्यांनी गावकरी मंडळीस आश्वस्त केले. घरात ठेवलेल्या बिबटाच्या पिल्ल्याचा त्यांनी ताबा घेतला. आणि काढता पाय घेतला. या पिल्लाच्या उजव्या डोळ्यास थोडी जखम झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा-विदर्भात लोकसभेचा विधानसभानिहाय कौल कोणाच्या फायद्याचा ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्या घटना सातत्याने घडत आहे. तीन दिवसापूर्वी वाई गावात रात्रीच्या वेळेस बिबट्याने गायीचा फडश्या पाडला होता. रोहणा येथील गोपालक संजय बोन्द्रे यांची वाईत शेती आहे. याच शेतात ते गाय व अन्य जनावरे बांधून ठेवतात. रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करीत गायीची शिकार केली. त्यामुळे बोन्द्रे यांना तीस हजार रुपयाचा फटका बसला. बिबट्याचा या परिसरात वावर असल्याने पशू पालकांमध्ये घबराट निर्माण झाली असल्याची चर्चा होते. वन विभागाने पंचनामा करीत पीडित शेतकऱ्यास योग्य ती नुकसानभरपाई देण्याची खात्री दिली आहे. बिबट्याना आता आवर कसा घालणार, असा प्रश्न केल्या जात आहे.