देवेंद्र गावंडे
सरबराई, आदरातिथ्यात विदर्भाचा हात कुणी पकडू शकत नाही हे खरेच. बोलके व मोकळ्या स्वभावाचे वैदर्भीय पाहुण्यांना तृप्त करून सोडतात हे वैशिष्ट्य साऱ्या जगाला ठाऊक असलेले. मात्र हाच विदर्भ याच मातीत जन्मलेल्या प्रतिभावंतांचे कौतुक करण्यात कमी पडतो का? या प्रदेशात कौतुकबुद्धीची वानवा वारंवार का दिसते? सांस्कृतिक मागासलेपणातून हा प्रकार होत असेल का? यासारखे प्रश्न ‘नरहर कुरुंदकर’ हा नाट्यप्रयोग बघितल्यावर स्वाभाविकपणे मनाला स्पर्शून जातात. कुरुंदकर मराठवाड्यातील नांदेडचे. त्यांना जाऊनही आता चार दशके लोटली. मात्र त्यांनी पेरलेल्या विचाराचा प्रभाव आजही अनेकांच्या मनावर कायम आहे. राजकारण, समाजकारण, धर्म, यावरची त्यांची समीक्षा आजही विवेकवादी माणसाला थक्क करून सोडते. त्यांचे विचार नव्या पिढीला कळावेत यासाठी अजय व ज्योती आंबेकर या माध्यम क्षेत्रातील दाम्पत्याने हा नाट्याविष्कार उभा केला. तसे हे दोघेही मूळचे मराठवाड्याचे. त्यांची अख्खी कारकीर्द मुंबईत गेली पण आपल्या मूळ प्रदेशाशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही. हा प्रयोग त्याचेच निदर्शक. कसलेही मानधन न घेता आंबेकर व इतर कलावंत तो राज्यभर सादर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला येणाऱ्या कौतुकाचा आनंद व्हायलाच हवा. दु:ख हे की विदर्भात असे आंबेकर का तयार होत नाहीत? विदर्भात प्रतिभावानांची कमतरता आहे असेही नाही. तरीही त्यांच्यावर असा एखादा प्रयोग बेतावा, त्याचे सादरीकरण करावे असे कुणालाच का वाटत नसेल? प्रकांड पंडित भाऊ दप्तरी हे विदर्भाचे. त्यांच्या ग्रंथांचे कौतुक करणारा बुद्धिवाद्यांचा मोठा वर्ग आजही राज्यात आहे. खुद्द लोकमान्य टिळक त्यांच्या विचाराने प्रभावित झाले होते. नागपुरातील महालात राहणाऱ्या दप्तरींचे नाव आज किती जणांना ठाऊक आहे? समाजातील साऱ्यांकडून या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची अपेक्षाही नाही पण विद्येच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना तरी दप्तरी ठाऊक असतील का? शंकाच आहे.
प्रश्न केवळ इतिहासात रमण्याचा नाही, तो पुढे नेण्याचा आहे. या मुद्यावर वैदर्भीय एवढे आळशी का? राम शेवाळकर हे विदर्भातून जगभर पोहोचलेले नाव. वक्ता दशसहस्त्रेषु ही पदवी साऱ्यांनी त्यांना सन्मानाने बहाल केली. विदर्भाच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे. त्याचे स्मरण आज कितीजण करतात? केवळ त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नावे काही पुरस्कार दिले म्हणजे झाले स्मरण या मानसिकतेत विदर्भ किती काळ वावरणार? सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटना विदर्भात आहेत. त्यापैकी एकालाही शेवाळकरांच्या वाणीची महती नव्या पिढीला कळावी असे वाटू नये? खरे मागासलेपण हे आहे व ते राज्यकर्ते दूर करतील अशी अपेक्षा वैदर्भीय बाळगून आहेत की काय? सुरेश भट नावाचा अवलिया कवी विदर्भात होऊन गेला. मराठी गझलेचा नवा काव्यप्रकार त्यांनी रूढ केला. एखाद्या नाट्यगृहाला त्यांचे नाव दिले म्हणजे काम संपले या मानसिकतेत वैदर्भीय किती काळ वावरणार? त्यांच्या गाण्यांचे अनेक कार्यक्रम होतात हे खरे पण अत्यंत अभावग्रस्ततेत जगलेल्या या कवीचा जीवनपट उभा करावा असे कुणालाच कसे वाटत नाही? तीच गोष्ट कवी ग्रेसांची. त्यांचेही विस्मरण अनेकांना आता होत आलेले. अशीच स्थिती कायम राहिली तर पुढची पिढी ग्रेस पुण्याचे होेते का असा प्रश्न सहज विचारेल. काव्यातून ते अजरामर असतीलही पण त्यांची आठवण एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवणे याला करंटेपणा नाही तर काय म्हणायचे? दादा धर्माधिकारी, ठाकूरदास बंग, बापूजी अणे, शिवाजीराव पटर्धन, पुरुषोत्तम दारव्हेकर अशी कितीतरी नावे विदर्भाच्या मांदियाळीत भर घालणारी. या साऱ्यांनी केलेले अतुलनीय कार्य नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी वैदर्भीयांची नाही काय? स्वातंत्र्यलढा असो समाजसेवा अथवा रंगमंच असो वा साहित्य. या प्रत्येक क्षेत्रात या साऱ्यांनी मोठा ठसा उमटवला. या महनीय व्यक्तींच्या कार्यावर एखादा शोधप्रबंध लिहिला, आचार्य पदवी मिळाल्यावर तो कपाटात टाकून दिला की झाले स्मरण. एवढ्यापुरते आपण मर्यादित राहणार आहोत का? किंवा या सर्वांची नावे एखादा चौक वा रस्त्याला दिली म्हणजे कर्तव्यपूर्ती झाली अथवा ऋणातून उतराई झाली या समजात वैदर्भीय किती काळ वावरणार? असल्या संकुचित वृत्तीमुळेच विदर्भ मागे राहात आला हे सत्य आतातरी स्वीकारायला हवे. साहित्य, कला व विचाराच्या प्रांतात वावरणाऱ्या प्रतिभावंतांना प्रोत्साहन द्यायला हवे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे, त्यांच्या कौतुकाचा डंका राज्यभर कसा वाजेल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे किती वैदर्भीयांना वाटते? मुळात तसे वातावरणच विदर्भात कधी निर्माण होऊ शकले नाही.
महेश एलकुंचवार, आशा बगे यांच्यासारख्या साहित्यातील दिग्गजांना सर्वात आधी मानसन्मान मिळाला तो पुण्या, मुंबईत. तिकडच्या वर्तुळाने त्यांच्या कार्याची दखल घेतल्यावर मग वैदर्भीयांना जाग आली. आता काही म्हणतील की या लेखकांसाठीची व्यासपीठेच तिकडे उपलब्ध आहेत. त्याला आम्ही काय करणार? वरवर खरा वाटणारा हा मुद्दा सपशेल खोटा व वैदर्भीयांच्या कर्तव्यच्युतीवर पांघरुण घालणारा आहे. असे व्यासपीठ विदर्भातही तयार व्हावे यासाठी येथील धुरिणांना कुणीही रोखले नव्हते. अशा सन्मानाच्या जागा तयार करायला कष्ट घ्यावे लागतात. दीर्घकाळ संयम बाळगत काम करावे लागते. त्यासाठी जी चिकाटी लागते तीच वैदर्भीयांमध्ये अभावाने दिसते. अगदी अलीकडच्या काळाचा विचार केला तर मुंबई, पुण्यात जाऊन कलेच्या क्षेत्रात नाव कमावणारे अनेक कलावंत विदर्भातील आहेत. वैशाली माडे, भरत गणेशपुरे, आर्या आंबेकर, शंतनू रोडे अशी कितीतरी नावे घेता येतील. त्यातल्या किती लोकांना आरंभीच्या काळात विदर्भातून प्रोत्साहन व कौतुक मिळाले? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला एकदा विचारावा अशीच सध्याची अवस्था आहे. तिकडे जाऊन हे लोक मोठे झाले, मग आपण त्यांना डोक्यावर घेणे सुरू केले. कलेचे क्षेत्रच तिकडे बहरलेले आहे. त्यांच्या गुणांना तिकडेच वाव मिळणार, त्याला वैदर्भीय तरी काय करणार? असले प्रश्न उपस्थित करून आपण आपल्या कूपमंडूक वृत्तीवर किती काळ पांघरुण घालत बसणार? विदर्भातही कलेला राजाश्रय, लोकाश्रय मिळावा यादृष्टीने कधी प्रयत्नच झाले नाहीत. ज्यांनी तिकडे जाऊन नाव कमावले त्यांचे तरी कौतुक आपण मनापासून करतो का?
येथील प्रतिभावंतांची ओळख जगाला करून देणारी प्रतीके विदर्भात सहज निर्माण करता आली असती. पण, त्यातही आपण कद्रूपणा दाखवला. अगदी अलीकडचेच उदाहरण द्यायचे झाले तर साहित्य अकादमीचा सन्मान मिळवणाऱ्या पवन नलाट या अमरावतीच्या युवा कवीचा यथोचित गौरव विदर्भाच्या किती व्यासपीठावरून झाला? वैदर्भीय प्रतिभावंताचे तिकडे जेवढे कौतुक होते तेवढे विदर्भात का होत नाही? आपल्याच माणसांविषयी एवढी परकेपणाची भावना बाळगणारा व कौतुकात कंजूषी करणारा विदर्भ सांस्कृतिकदृष्ट्या कधीच उन्नत होणार नाही. हेच वास्तव आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आधी मनाची कवाडे मोकळी करावी लागतील. निरपेक्ष कौतुकबुद्धी अंगी भिनवावी लागेल. त्याची तयारी वैदर्भीय कधीतरी दाखवणार आहेत का?
devendra.gawande@expressindia.com