नागपूर : विवाहित प्रेयसी अन्य युवकासोबत नको त्या अवस्थेत दिसल्याने चिडलेल्या प्रियकराने वाद घातला. त्यामुळे प्रेयसीने दुसऱ्या प्रियकरासोबत कट रचला व पहिल्या प्रियकराचा गळा आवळून खून केला.ही थरारक घटना १४ मैल परिसरात उघडकीस आली. आझाद जमशेद शेख (२५, वडचिचोली, पांढुर्णा-मध्यप्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी आरोपी प्रियकर दिलीप काशीराम पटले (२८, लावा, वाडी) आणि त्याची प्रेयसी सुनीता (३०, काल्पनिक नाव) यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद शेख हा १४ मैल परिसरातील सचिन माकोडे यांच्याकडे चिकन कापण्यासाठी मजुरीने काम करीत होता. सचिनने त्याला खोली भाड्याने दिली होती. त्याच्या शेजारी मूळची मध्यप्रदेशातील रिवा येथील सुनीता ही कुटुंबासह राहत होती. सुनीता ही पती आणि चार मुलांसह राहते. पती-पत्नी चायनिजचा ठेला चालवतात. शेजारी राहणाऱ्या आझाद शेखसोबत तिचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. तिच्या ५५ वर्षीय पतीला दारूचे व्यसन असून तो नेहमी नशेत असतो. त्याचाच गैरफायदा घेऊन सुनीता आणि आझाद प्रेमसंबंध ठेवत होते.

हेही वाचा : सभागृहात कोणाचाही आवाज दाबला जाणार नाही ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादरम्यान सुनीताशी ओळख दिलीप पटले या युवकाशी झाली. सुनीताचे त्याच्याशी सूत जुळले. सुुनीताला पहिला प्रियकर आझाद आणि दुसरा प्रियकर दिलीप हे दोघेही आवडायला लागले. त्यामुळे ती दोघांवरही प्रेम करीत होती. २१ सप्टेंबरला रात्री दहा वाजता दिलीप आणि सुनीता हे दोघेही खोलीत बंद होते. या दरम्यान तेथे आझादही आला. त्याला प्रेयसी दिलीपच्या बाहुपाशात दिसल्यामुळे तो संतापला. दोघांनाही शिवीगाळ करीत होता.त्यामुळे सुनीता आणि दिलीप यांनी आझादचा काटा काढण्याचा कट रचला. सुनीताने आझादचे हात पकडले तर दिलीपने त्याचा गळा आवळून खून केला. त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. कळमेश्वरचे ठाणेदार आसिफ शेख यांना हत्याकांडाचा संशय आला. त्यांनी दोन तासांत आरोपी सुनीता आणि दिलीपला ताब्यात घेतले. दोघांनीही हत्याकांडाची कबुली दिली.