लोकसत्ता टीम

नागपूर : कंपनीत रक्कम गुंतवल्यास एका वर्षांत दुप्पट परतावा मिळेले, असे आमिष दाखवून नागपुरातील तीन कोळसा व्यापाऱ्यांना बी.एस. इस्पात कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि लेखापालाने दिले. व्यापाऱ्यांनी दोन कोटींची रक्कम गुंतवल्यानंतर दोघांनी परस्पर रक्कम हडप करून फसवणूक केली. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

राजेशकुमार सिंग (३८, फ्रेंड्स कॉलनी) असे तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव आहे. ते कोल ट्रेडिंग व मायनिंगचा व्यवसाय करतात तसेच अभिनव ट्रेडिंग ही कंपनी चालवतात. बी.एस.ईस्पात लिमीटेड या कंपनीशी त्यांनी मिल माईन्ससंदर्भात व्यवहार केला होता व तेव्हा त्यांची ओळख तेथील व्यवस्थापकीय संचालक भवानीप्रसाद मिश्रा याच्याशी झाली होती. २०२२ मध्ये मिश्रा व त्या कंपनीतील अकाऊन्टंट सागर कासनगोट्टुवार यांनी सिंग यांना धंतोलीतील चिंतामणी अपार्टमेंट्समधील कार्यालयात भेटायला बोलविले. ‘जर तुम्ही व तुमच्या परिचयातील लोकांनी आमच्या कंपनीत पैसे गुंतविले तर वर्षभरात दुप्पट करून देतो’ अशी बतावणी केली. दोघांवर विश्वास ठेवून सिंग हे त्यांचे परिचित ब्रिजेश अग्रवाल व मेधा किशोर अग्रवाल यांना घेऊन दोघांना भेटले.

आणखी वाचा-सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; चार आठवड्यात पदोन्नती देण्याचे ‘मॅट’चे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८ एप्रिल २०२२ ते २९ मार्च २०२३ या कालावधीत सिंग यांनी स्वत: १.३४ कोटी रुपये मिश्राच्या खात्यात वळते केले. मिश्राने नफ्याच्या नावाखाली त्यातील ४७ लाख परत केले. मात्र उर्वरित ८७ .३५ लाख दिलेच नाही. मेधा अग्रवाल यांनी ५८ लाख तर ब्रिजेश अग्रवाल यांनी ५० लाख गुंतविले होते. मात्र आरोपींनी त्यातील एकही पैसा परत केला नाही. सिंग व इतर दोघांचे मिळून आरोपींनी १.९३ कोटी रुपये गंडविले. तक्रारदारांनी वारंवार त्यांना पैसे परत देण्याबाबत विचारणा केली. मात्र आरोपी टाळाटाळ करत होते. अखेर सिंग यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या फसवणूक प्रकरणात एका मोठ्या राजकीय नेत्याचा संबंध असल्याची चर्चा आहे.