अकोला : बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेले टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकलप्नेतून ‘महा स्माईल’ विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

विदर्भातील अशा बालकांवर उपचार आणि जनजागृतीची गरज ओळखत ‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्वच्या शेफाली बजाज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सामाजिक उत्तरदायित्वातून ही मोहीम पूर्णपणे मोफत राबवली जाईल. अकोल्यासह विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये बालकांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ‘महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती आणि उपचार मोहीम’ हजारो बालकांना नवजीवन देणारी एक आशावादी चळवळ ठरणार आहे.

आगळ्यावेगळ्या मोहिमेला नागपूर येथे ३१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत स्वामी विवेकांनद मेडिकल मिशन रुग्णालय येथील प्रारंभ होणार आहे. या उपक्रमांतर्गत पुढील ९० दिवसांत तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भातील संपूर्ण ११ जिल्ह्यात ‘क्लेफ्ट’ विकाराविषयी माहिती देणार आहेत. यामध्ये लवकर निदान, उपचाराची शिफारस आणि गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची नोंदणी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या बालकांवर अकोला, नागपूर, गोंदिया, वर्धा येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकारावर उपचारामध्ये सहा ते सात शस्त्रक्रिया

‘क्लेफ्ट’ विकार हा जन्मजात असून यात ओठ आणि टाळू हे दुभंगलेले असतात. जवळपास ७०० मुलांपैकी एका मुलांमध्ये हा विकार दिसून येतो. यावर शस्त्रक्रिया करूनच हा विकास दूर करता येतो. वेळीच उपचार केले नाहीत, तर कान बधिर होणे, बोलण्यात अडथळा येणे अशा वेगवेगळ्या व्यंगासोबत सामाजिक एकटेपणा येऊ शकतो. या विकारावर उपचार असून सहा ते सात शस्त्रक्रियेनंतर यावर पूर्णपणे मात करता येते. या सर्व शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने आर्थिक दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना ते परवडणारे नाही. म्हणूनच संवेदशील नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी ‘क्लेफ्ट’वरील उपचार संपूर्ण मोफत व्हावे, यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. विकारग्रस्त बालकांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे जीवन पूर्णतः सामान्य होऊ शकते. यासाठी केवळ उपचारच नव्हे, तर जागरूकता ही देखील तितकीच गरजेची आहे. त्यामुळे ‘महा स्माईल्स’ ही मोहीम विदर्भातील बालकांसाठी आरोग्यदूत ठरणारी आहे.