नागपूर : सध्या संपूर्ण राज्यात गाजत असलेला पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी पुण्यातील ४० एकर सरकारी जमीन कवडीमोल दरात विकत घेण्यात आल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. विशेष म्हणजे या जमीन खरेदी व्यवहारासाठी केवळ ५०० रुपये स्टँपड्युटी आकारण्यात आल्यानेही कागदोपत्री पुरावाच समोर आला. त्यानंतर, विरोधकांनी याप्रकरणावरुन सरकारला लक्ष्य केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

फडणवीस शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमासाठी नागपूरात आले असता त्यांना वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जमीन घोटाळ्याच्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे. काही अधिकार्‍यांवर कारवाई केली आहे. यात कोणालाही सोडणार नाही, कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

काय आहे प्रकरण

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने ४० हेक्टर जागेच्या खरेदीचा जो दस्त केला होता. त्याप्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग१ अधिकारी संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. ही तक्रार जमिनीची विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात पार्थ पवार यांच्या विरोधात तक्रार दिली गेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य राष्ट्रवादी चे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यानंतर अजित पवार यांनीच वादग्रस्त जमिनीचा खरेदी व्यवहार रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. मात्र विरोधकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर मुखमंत्र्यांनी या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असे स्पष्ट केले.