वर्धा : मराठा आंदोलनाने मुंबई गाजली. मुंबईचा कंठहार असलेल्या दक्षिण मुंबईत या आंदोलनाने उसळलेली गर्दी पाहून खासदार मिलिंद देवरा यांनी या भागात कुठलेच आंदोलन होवू नये म्हणून जाहीर मागणी केली होती. पण त्याची दखल नं घेता आता हजारो कर्मचारी आझाद मैदानात धडकणार आहे. महाराष्ट्र नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी व कंत्राटी कामगार यांच्या संघटना आंदोलनात उतरणार आहे. प्रश्न वेतनाचा आहे. वित्त विभागाची आडमुठी भूमिका व नगर विकास खात्याचा ढिसाळ कारभार यामुळे वेतन नियमित मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कर्मचारी समन्वय समितीसोबत यावर्षी २७ जूनला नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवसोबत बैठक झाली होती. त्यात शासनाने सकारात्मक भूमिका घेतली. पण आता तीन महिने झाले, पण वेतन मिळालेले नाही, असे समन्वय समिती निमंत्रक दीपक रोडे सांगतात. संघटनेने काही मुख्य मागण्या मांडल्या आहेत.

ऑगस्ट पर्यंतचे थकीत वेतन एकमुस्त द्या. यापुढे महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वेतन मिळावे. कर्मचाऱ्यांचे समावेशन व्हावे. नगर पंचायत स्थापन झाल्यापासूनचे थकीत वेतन व्हावे. नगर पंचायत कर्मचाऱ्यांना पण ग्रामपंचायत प्रमाणे सेवानिवृत्ती व रजा रोखीकरण सुविधा देण्यात यावी. नक्षलग्रस्त भागातील आमच्या कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी, जुनी पेन्शन योजना, थांबवलेली आगाऊ वेतनवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, सफाई कामगारांना मोफत घर व जोखीम भत्ता, स्वच्छता निरीक्षक वेतनश्रेणी वाढ व अन्य मागण्या आहेत.

संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात हे नमूद करण्यात आले आहे. वेतन थकीत असल्याने कर्ज, बांधकाम खर्च, विमा व अन्य हफ्ते थकीत पडले आहे. उपासमार होतच आहे. मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत. हे पूर्वीच निदर्शनास आणले. पण दखल नं झाल्याने रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईत येत आहे, असे संघटना स्पष्ट करते.

९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता राज्यभरातून पालिका व पंचायत कर्मचारी आझाद मैदानात रोष व्यक्त करणार असल्याचे संघटना समन्वय समितीचे नेते सुरेश पोसतांडेल, विश्वनाथ घुगे, पी. बी. भातकुले, भाऊसाहेब पठाण, नागेश कंडारे, दीपक रोडे, धर्मा खिल्लारे, मारोती गायकवाड, गिरीश डुबेवार व अन्य नेत्यांनी जाहीर केले.