अकोला : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान होऊ नये म्हणून प्रत्येक मतदारसंघातील भाजपा उमेदवारांच्या पराभवासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहेत. देशहिताचे कार्य करणाऱ्या नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी विरोधकांकडून अफवांचा बाजार सुरू असल्याची टीका भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. मतभेद निर्माण करण्याच्या षडयंत्रापासून सावध राहण्याचा सल्लादेखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा >>> अमरावतीची जागा भाजपच लढणार!- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा, म्हणाले, ‘एकदा निर्णयानंतर काम करावेच…’

अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या संचलन समिती व पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, तर व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे, आदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या निवडणुकीतील तयारीचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्यात. यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय तयारीची माहिती घेण्यात आली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सध्या विरोधक हतबल झाले आहेत. त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे ते प्रयत्न करतील. त्यापासून सावध राहण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी विरोधक एकजुटीने कामाला लागले आहेत. एक-एक जागा कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या मुद्यांवरून ते भाजपा व समर्थकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यापासून सावध राहून भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.’

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे म्हणतात,‘भाजपचे स्वातंत्र्यलढ्यात योगदानच काय?, गोमांस निर्यात करणाऱ्याकडूनही निवडणूक रोखे…’

अकोला लोकसभा मतदारसंघात ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मताधिक्य मिळण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कामाला लागा. भाजपा कार्यकर्त्यांनी बुथ लढाई जिंकण्याच्या दृष्टीने कार्यरत राहावे. आदेश किंवा मान-अपमानापेक्षा राष्ट्र व पक्ष महत्त्वाचा आहे. आपापल्या बुथवर मताधिक्य मिळवण्याचे एकमेव लक्ष्य ठेवले पाहिजे, असा कानमंत्रदेखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

पक्षाने दिलेल्या २४ महत्त्वाच्या कामासंदर्भात प्रत्येक कार्यकर्त्यांनी जबाबदारीने कार्य करावे. ही निवडणूक सोपी नाही तर ती आव्हानात्मक समजून कार्य करावे, असे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. बैठकीचे सूत्रसंचालन भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी तर आभार प्रदर्शन जयंत मसने यांनी केले. यावेळी भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

सण-उत्सवामध्ये प्रचाराचे लक्ष्य

निवडणुकीच्या काळामध्ये विविध सण उत्सव आहेत. भाजपा स्थापना दिवसदेखील येत आहे. कार्यकर्त्यांनी मतदार, लाभार्थ्यांशी संपर्कात राहून पक्षाला ४० दिवस देण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. सण-उत्सवामध्ये प्रभावी प्रचार करण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे.