नागपूर : रामटेकचा केवळ पायाभूत सुविधांपुरता विकास न करता या शहराचे धार्मिक आणि पर्यटन महत्व लक्षात घेता त्याचे देश-विदेश पातळीवर ब्रॅंडिंग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये रामटेक महोत्सव आयोजित केला जाणार आहे. यासाठी १ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील राकटेक हे महाराष्ट्रातील नव्हे, तर संपूर्ण भारतातील धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वाचे ठिकाण आहे. रामटेक हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर साहित्यिक काव्यतीर्थ म्हणूनही ओळखले जाते. येथे श्रीरामचंद्रांनी त्यांच्या वनवास काळात वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे. येथे श्रीराम मांदिर, गडकोट तसेच इतर अनेक धार्मिक स्थळे असून दरवर्षी हजारो भाविक, पर्यटक येथे भेट देतात. त्याचबरोबर भारतीय व राज्य पुरातत्व विभागांतर्गत अनेक मंदिरे, किल्ले, लेणी आढळतात.
धार्मिक पर्यटनासाठी श्रीरामचंद्रांच्या वास्तव्याशी जुळलेली मंदिरे आणि गड, साहित्यिक पर्यटनासाठी कालिदासांचे मेघदूत, ऐतिहासिक वारशासाठी वाकाटक साम्राज्यकालीन नगरधन किल्ला व अवशेष, विविध धर्मियांची पारंपारिक स्थळे, निसर्ग पर्यटनासाठी तलाव, वनराई, जैवविविधता, वन्यजीव अभयारण्य, साहसी पर्यटनासाठी अनुकूल निसर्ग याबाबींमुळे रामटेक हे एकात्मिक पर्यटनाचे आदर्श केंद्र ठरू शकते.
त्यामुळे रामटेकचा विकास करताना केवळ पायाभूत सुविधांपुरताच मर्यादित विचार न करता एकात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यासाठी त्याचा प्रचार, प्रसार व ब्रॅंडिंग करण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये तेथे रामटेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
त्यासाठी येणाऱ्या एक कोटी रुपये खर्चास राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यापूर्वी राज्य शासनाने रामटेकमध्ये चित्रनगरी उभारण्याचीही घोषणा केली आहे. त्यासाठी सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशीष शेलार यांनी जागेची पाहणीही केली आहे. पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीनेही शासनाकडून पावले उचलली जात आहे.
