नागपूर : भारतात यंदा पूर्व मोसमी पावसापासून तर मोसमी पावसापर्यंत एकूणच पद्धती खूपच बदललेली आहे. त्यामुळे पावसाचा नेमका अंदाज घेणे कठीण होत आहे. महाराष्ट्रात आणि विशेषकरुन विदर्भात या आठवड्याच्या सुरुवातीला तब्बल चार दिवस पावसाने कहर केला आणि पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. पूर्व आणि पश्चिम राज्यांमध्ये तर सातत्याने पाऊस सुरू आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातून येणारे चक्रीवादळ महाराष्ट्रात पोहचत असून पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. अनेक राज्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे.

बंगालच्या उपसागरातून निर्माण होणारे चक्रवाती वातावरण झारखंड छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात पोहोचत असून, त्यामुळे आज, शनिवारी, देशभरातच मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी अरबी समुद्रातून ६५ किलोमीटर वेगाने वारे येत आहेत. त्यामुळे एकत्रितपणे एक हंगामी प्रणाली तयार होत आहे. पश्चिम बंगालच्या विस्तीर्ण गंगेच्या मैदानावर कमी दाबाचे क्षेत्र आहे, जे झारखंड आणि दक्षिण छत्तीसगडकडे जाईल. त्यानंतर, येत्या २४ तासांत, ही प्रणाली पश्चिमेकडे सरकेल आणि मध्य प्रदेशात पोहोचेल. या काळात, या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या प्रणालीशी संबंधित चक्रवाती परिस्थिती पश्चिम बंगाल, झारखंड आणि आसपासच्या भागात पसरली आहे. यासोबतच, पूर्व-पश्चिम ट्रफ (दाब रेषा) ओडिशा, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशपर्यंत पसरली आहे. छत्तीसगड-महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर आजूबाजूच्या राज्यांवर दिसून येईल. शुक्रवारी झालेल्या पावसानंतर हवामान खात्याने महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केला आहे. त्याच वेळी, हवामान खात्याने आज झारखंड, मध्य प्रदेश आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत कसे असेल हवामान?

भारतीय हवामान खात्याने आज या प्रदेशासाठी कोणतेही सक्रिय हवामान अलर्ट जारी केलेले नाहीत. तथापि, सक्रिय मान्सूनच्या प्रभावाखाली शहराच्या काही भागात आणि कोकण किनारपट्टीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात ४०-५० किलोमीटर प्रतितास वेगाने गडगडाटी वादळे आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान २६-२८ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहू शकते. आर्द्रता पातळी सुमारे ८३ टक्क्यांवर राहील, ज्यामुळे अधूनमधून पाऊस पडत असला तरी अस्वस्थता वाढेल.