नागपूर: महाराष्ट्रातील गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीत लवचिकता आणि धोरणात्मक डावपेचांचे मिश्रण दिसून आले आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये फडणवीस केंद्रस्थानी आल्यापासून त्यांनी मित्र-शत्रू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, महाराष्ट्रातील प्रमुख नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी बरोबरी केली.

पाच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना वेगळी झाल्यापासून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यापासून ते भाजपमधील अंतर्गत संघर्षांसह अनेक राजकीय आव्हानांवर मात केली. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनाही हाताशी घेत उपमुख्यमंत्री केले. नागपूरमध्ये दिवाळी मिलन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलखुल्लास चर्चा केली. यावेळी त्यांनी कायम हलकेफुलके वाटणारे त्यांचे व्यक्तिमत्व गंभीर कसे झाले आणि गंभीर वाटणारे अजीत पवार इतके गमतीशीर कसे झाले? या प्रश्नावर गमतीशीर उत्तर दिले.

महाराष्ट्रामध्ये सध्या जातीचे राजकारण वाढले आहे?, पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसली जात आहे का? असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, निवडणुका आल्या की, राजकीय लोक जातीचे राजकारण करतात. मतदारांचा याचाशी काही संबंधही नसतो. अनेकदा मतदारांना जातीचा फरक पडत नाही. परंतु, राजकीय नेत्यामुळे जातीची समिकरणे अधिक तीव्र होतात. सगळ्याचे समाजाचे, जातींचे प्रश्न आहेत. यात दुमत नाही. प्रत्येकांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्नही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर हे जातीचे राजकारण आपोआप कमी होईल, असेही ते म्हणाले.

आता आव्हानांची भीती वाटत नाही: मुख्यमंत्री

मी फार गंभीर असतो असे जर कुणाला वाटत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. मी कायमच आनंदी आणि हसतमुख राहण्याचा प्रयत्न करतो. हल्ली आता इतकी आव्हाने पाहून झाली की त्यांची भीती वाटत नाही. ही भीती मनातून निघून गेली. मात्र, नवनवीन आव्हाने आली की त्यांचा त्रास होतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.