नागपूर : आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील सात दिवसांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील सात दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
मुसळधार पावसाची शक्यता कुठे?
१७ ते १९ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि १९ व २० ऑगस्टला गुजरातमधील सौराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. १८ ऑगस्टला किनारी आंध्र प्रदेशात तसेच ओडिशा आणि तेलंगणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजपासून २१ ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र, गुजरात, २० ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, १८ ऑगस्टला मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्राची स्थिती काय?
मध्य भारतावर निर्माण होत असलेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर, सोलापूर, धाराशिव, आणि लातूर जिल्ह्यांचा काही भाग यांचा समावेश आहे. या दरम्यान खान्देश आणि उर्वरित मराठवाड्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तुलनेत विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
दक्षिण भारतातही मुसळधार पाऊस…
१८ ऑगस्टला दक्षिण भारतातील कर्नाटकच्या किनारी भागात, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजपासून २० ऑगस्टपर्यंत आंध्रप्रदेशच्या किनारी भागात आणि तेलंगणातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच २० ऑगस्टपर्यंत केरळमधील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या राज्यांमध्येही पाऊस…
देशाच्या उत्तरेकडील भागातही पावसाची शक्यता आहे. १९ ऑगस्टपर्यंत जम्मू आणि काश्मीर, लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. १८ ऑगस्टला हिमाचल प्रदेश, २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता आहे. १९ ऑगस्टपर्यंत पूर्व राजस्थान आणि १८, २२ आणि २३ ऑगस्टला पंजाबमध्ये, २२ आणि २३ ऑगस्टला हरियाणासह चंदीगड आणि दिल्लीत पावसाची शक्यता आहे. तसेच २१ ते २३ ऑगस्ट याकाळात उत्तर प्रदेशातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे.