नागपूर : उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यभरात शनिवारी दमदार पाऊस झाला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांतील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शनिवारी संततधार होती. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये शनिवारी २५७.८० मिमी पावसाची नोंद झाली.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्याला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने शनिवारी सकाळपासून तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद असून, दहा मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे.
गोंदिया जिल्ह्यात शुक्रवार मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील एकमेव गंगाबाई महिला रुग्णालयात दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे मेघा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चिखलदरा तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ६५.६ मिलीमीटर तर धारणी तालुक्यात ४४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यातही शनिवार सकाळपासून पाऊस सुरू आहे. मेहकर तालुक्यातील अजनी गावानजीक काच नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या चार शेतकऱ्यांना गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान मिळाले. नागपूर जिल्ह्यातदेखील शुक्रवारी रात्रीपासूनच पाऊस आहे.
जायकवाडी धरण ८०. ७६ टक्क्यांवर
गोदावरी नदीतून पाणीसाठा वाढल्याने जायकवाडी धरण ८०. ७० टक्क्यांवर गेले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड, शेकटा आणि बिडकीन भागात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. वेरुळ येथील लेणीवरचा धबधबाही सुरू झाला. परभणी जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून सलग पाऊस आहे. या पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामाला मोठाच दिलासा मिळाला. धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात सर्वत्र संततधार आहे.
उत्तर महाराष्ट्र कोरडा
नाशिक : नशिक जिल्ह्यात आठवडाभरापासून विश्रांती घेतलेला पाऊस शुक्रवारपासून संततधारपणे सुरू आहे. यंदा जून महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणांमधील साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. पुन्हा पाऊस सुरू झाल्याने दारणा, वालदेवी, कडवा, करंजवण, वाकी, भावली, भाम, नांदुरमध्यमेश्वर या धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये मात्र पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत.
दोन जण बुडाले
●यवतमाळ जिल्ह्यातील भिसनी टाकळी येथील तलावात पोहायला गेलेला तरुण बुडाल्याची घटना शनिवारी घडली. श्रेयस सुरेंद्र तुरकोन (२२) रा. वारको सिटी, यवतमाळ असे तरुणाचे नाव आहे.
●नागपूर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणा तालुक्यातील सालई मेंढा तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. पीयूष सूरज सुखदेवे (२०) असे या तरुणाचे नाव आहे.