नागपूर : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात परतीच्या पावसाच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. त्यानंतर सलग चार ते पाच दिवस परतीचा पाऊस कोसळला, पण ऑक्टोबर उजडताच परतीच्या पावसाची वाटचाल थबकली. दरम्यान, राज्यात तापमानात कमालीची वाढ झाली. अजूनही राज्यातील अनेक शहरांमधील तापमान ३६ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे. तर आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाची थबकलेली वाटचाल सुरू झाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थांबलेला परतीचा पाऊस आता पुन्हा सुरू झाला आहे. भारतीय हवामान खात्याने आज, सोमवारी राज्याच्या अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. रविवारी देखील राज्यातील अनेक भागात पाऊस झाला, तर विदर्भात मात्र तापमान ४६ अंश सेल्सिअस पलीकडे गेले. दरम्यान, हवामान खात्याने आज पावसाचा इशारा दिल्याने उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे. विशेषकरून कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईत देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र येथे तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : ‘आधार सिडिंग’ अभावी २५ हजार बहिणींचे पैसे अडकले बँकेतच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई आणि उपनगरांमध्ये देखील हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस तर राज्यात सर्व ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ झालेली आहे. ऑक्टोबर हिट च्या चटक्यांपासून अजूनही सुटका नाही. एकीकडे वाढत चाललेले ऊन तर दुसरीकडे पावसाची हलकी सर येत असल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. विदर्भात देखील आज, सोमवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात देखील आज पावसाची शक्यता असून, पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूणच आज राज्यात अनेक ठिकाणी पाऊस असणार आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस तो कायम राहण्याची शक्यता आहे.