नागपूर : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख वाढत चालला असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूदर चिंताजनक वळणावर पोहोचला आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत महाराष्ट्रात सर्वाधिक २१८ मृत्यूंची नोंद आहे, तर गेल्या दहा महिन्यांत सुमारे ३० जणांचा वाघासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याने वाघासह इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मानवी मृत्यूची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ मध्ये आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यातील सर्वाधिक मृत्यू हे विदर्भात आणि प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जंगलांच्या आसपासच्या गावांमध्ये झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातच सात मृत्यू झाले आणि ते सर्व वाघांच्या हल्ल्यांशी संबंधित आहेत. विकास प्रकल्प, रेषीय प्रकल्प यांमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख वाढत आहे.

देशातील एकूण वाघांपैकी सुमारे ३० ते ४० टक्के वाघ अधिसूचित अभयारण्याबाहेर मुक्तपणे फिरत आहेत. अलीकडेच केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ‘टायगर आउटसाइड टायगर रिझर्व्ह’ या प्रकल्पाची घोषणा केली. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने हा प्रकल्प तयार केला आहे. २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षांसाठी हा प्रकल्प ‘पथदर्शी प्रकल्प’ म्हणून राबवण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी मानव-वाघ आणि सहभक्षक संघर्षाची नोंद आहे, त्याठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. त्यामुळे हा प्रकल्प संघर्ष कमी करण्यास कितपत यशस्वी ठरणार, हे प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतरच कळेल.

वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा बळी

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील आकापूर येथे वाघाच्या हल्ल्यात वासुदेव वेटे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. २४ ऑक्टोबरला सायंकाळी ते शेतात गेले ते परतलेच नाही. त्यामुळे २५ ऑक्टोबरला त्यांचा पुतण्या समीर वेटे त्यांच्या शोधात गेला असताना त्याला झुडपात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती आकापूरचे वनरक्षक भरणे यांना दिली. वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, पण गावकऱ्यांनी मृतदेह हलवण्यास नकार दिला. वन खात्याने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला.

बछड्याच्या विरहात वाघिणीचा वाहनांवर हल्ला

बछड्याला अपघातात गमावल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीने वाहनांवर हल्ला केला. चंद्रपूर महामार्गावरील केसलाघाट परिसरात ‘के मार्क’ नावाने प्रसिद्ध वाघिणीला तीन बछडे आहेत. अतिशय जोखमीच्या तिच्या अधिवासातून राष्ट्रीय महामार्ग जातो. मात्र तिने कधीही वाहनांवर हल्ला केला नव्हता. मात्र गेल्या चार दिवसांपासून ती केसलाघाटच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करत आहे. दोन दिवसांपूर्वी वाघिणीने एका दुचाकीवर झडप घातली.

यात खांबाळा येथील नागेश गायकी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी एक आता तिच्याबरोबर दिसून येत नाही. त्यामुळे अपघातात मृत पावलेला बछडा तिचाच असावा आणि बछड्याला गमावल्यामुळे ही वाघीण सैरभर होऊन वाहनांवर हल्ला करत असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रस्ते अपघातात मृत पावलेल्या बछड्याचे अवशेषाचा नमुना तपासणीसाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्रात पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे वन खात्यातील संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.