नागपूर: विद्युत क्षेत्रातील खासगीकरणाविरोधात राज्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील अधिकारी- कर्मचारी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंता अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वात बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहे. त्यामुळे वीज यंत्रणा सलाईनवर असतांनाच महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्माऱ्यांच्या विविध मागणीसाठी १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाची घोषणा केली गेली आहे. हे आंदोलन कसे राहणार? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या माहितीनुसार, एसटी कामगारांच्या न्याय मागणीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ पासून मध्यवर्ती कार्यालय मुबंई येथे रा. प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीकारिता धरणे आंदोलन सुरू केले जाईल. त्यानंतरही एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची सोडवणूक न झाल्यास १४ ऑक्टोबरपासून नागपूर विभागातील संयुक्त कृती समिती विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा व सर्व आगारात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाईल. टप्या टप्याने हे आंदोलन राज्यभरात होईल.
दरम्यान नागपूर विभागातील संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी महामंडळाचे नागपूरचे विभाग नियंत्रक विनोद चवरे आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने यांना निवेदन दिले गेले.
शिष्टमंडळात कृती समितीमधील महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार, कामगार सेनेच्या राज्य महिला संघटिका यामिनी कोंगे, महाराष्ट्र मोटार फेडरेशनचे विनोद कुमार धाबर्डे, कास्टट्राईब संघटनाचे संग्राम जाधव, मकेश्वर, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियनचे मुन्ना मेश्राम, सुधाकर गजभिये, सोसायटी अध्यक्ष प्रशांत बोकडे, जेष्ठ नेते अरुण भागवत, मुरलीधर गुरपुडे, संघटनेचे विभागीय अध्यक्ष जगदीश पाटमासे, कृष्णकुमार शेरकर, शशिकांत वानखेडे, अतुल निंबाळकर, गजानन दमकोंडवार, प्रवीण अंजनकर, लक्ष्मीकांत चौधरी, डीमोले, नितेश साकरकर, शर्मा, संदीप गडकीने, रितेश देशमुख, दिनेश पारडकर यांच्या सह मोठ्या प्रमाणात कृती समितीचे सभासद उपस्थित होते. शिष्टमंडळाने एसटी महामंडळाने न्याय न दिल्यास आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशाराही दिला.
महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समीतीचे पदाधिकारी काय म्हणतात ?
एसटी कामगारांच्या विविध मागण्यांवर शासनाने अनेक आश्वासने दिली. परंतु एकही पूर्ण केले जात नाही. त्यामुळे नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत आहे. शासनाने एसटी कामगारांना न्याय न दिल्यास तिव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आता एसटी कामगारांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असे महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे अजय हट्टेवार यांनी सांगितले.