नागपूर: राजकीय नेत्यांचे चाहते आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आपल्या नेत्यासाठी अनेकदा विविध उपक्रम राबवताना दिसतात. अनेकदा धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे भाजपमधील प्रभावी नेते आहेत. या दोघांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. देशभरात त्यांचे चाहते आहेत. नितीन गडकरी हे रोखठोक भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असल्याने देशात आणि विदेशातील त्यांच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. त्यांना नियमित भेटायला येणाऱ्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नेहमीच रीघ लागलेली असते. नागपूरमधील गडकरी आणि फडणवीस यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने अनोखा उपक्रम केला आहे. गडकरी केंद्रात मंत्री आणि फडणवीस राज्यात मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्याने वेगळीच मनोकामना केली होती.
हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी शुक्रवारी अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या दरगाहमध्ये उपस्थित राहून चादर चढवली. प्यारे खान यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळवा आणि विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मनोकामना केली होती. या दोन्ही नेत्यांचा यशस्वी विजय झाल्यानंतर त्यांनी ख्वाजा गरीब नवाज यांच्या दरगाहवर चादर चढवून आपली मन्नत पूर्ण केली.
शुक्रवारी नागपूरहून स्टार एअरवेजच्या नागपूर–किशनगढ फ्लाइटने अजमेरला पोहोचलेले प्यारे खान यांच्यासोबत सुमारे १५० जयरिनही दरगाह शरीफमध्ये पोहोचले. सर्व श्रद्धाळूंनी सूफी संतांच्या जियारतीस हजेरी लावली आणि चादर चढवली. यावेळी त्यांनी देशात अमन-शांतीसाठी दुआ मागितली. या प्रसंगी सलीम सोफी, शारिक पटेल, मौलाना गुफरान, मोहम्मद अली, सरफराज खान, एझाज खान, फैसल शेख, अशरफ खान, सूफियान खान, अशरफ वंगार, अतीक अन्सारी, ग्यासुद्दीन अशरफ, इब्राहिम शेख, इरफान खान, राशिद खान, सज्जाद अली, सालार शेख, सलीम अजानी, सय्यद रऊफ, ताज अहमद राजा, हाजी फारूक बावला, इमरान ताजी, मुस्तफाभाई टोपीवाला, वसीम खान यांसह अनेक श्रद्धाळू व प्यारे खान मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.