नागपूर : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत, जून महिन्याची पावसाची तूट भरून काढली. विदर्भात सलग चार दिवस पावसाने मुक्काम ठोकला आणि पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. बुधवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला. मात्र, आता पुन्हा पूर्व विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र निवळले असतानाच किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. यामुळे राज्यात पाऊस कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पूर्व विदर्भात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसाचे जवळजवळ सगळे रेकॉर्ड तोडले गेले. यवतमाळ, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तर या पावसाचा सर्वाधिक फटका नागपूर शहर आणि ग्रामीणला बसला. उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर कमी होत पावसाने उघडीप दिली आहे. आज, ११ जुलैला पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचा पट्टा कुठे निवळला, कुठे सक्रिय ?
दक्षिण पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. त्यालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या सुरतगडपासून, भिवणी, अलिगड, बांदा, दाल्तोंगज, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंडमधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
ऑरेंज आणि येलो अलर्ट कुठे ?
शुक्रवार, ११ जुलैला पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील जालना आणि परभणी या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता आहे.