बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारी ची घोषणा आज शनिवारी संध्याकाळी वा रात्री उशिरा होण्याची दाट शक्यता आहे.दुसरीकडे बुलढाण्यावरून ठाकरे गट व काँग्रेसमध्ये वादाची धुळवळ रंगल्याने घोषणेला विलंब होत असल्याचे वृत्त आहे.

बुलढाणा मतदारसंघावरून महायुती व आघाडीमध्ये प्रारंभी पासून चांगलीच जुंपली. दोघा मित्रांनी दावे प्रतिदावे केल्याने वाद दिल्ली दरबारी गेला. अखेर भाजपने नमते घेत माघार घेतली. याला शिस्तबद्ध भाजपमधील छुपी गटबाजी देखील कारणीभूत ठरली. चिखली च्या आक्रमक व महत्वाकांक्षी आमदार श्वेता महाले यांच्या नावाची चर्चा वाढली आणि घाटाखालील नेत्यांनी उचल खाल्ली. त्यांनी अमित शहांच्या दौऱ्यात बुलढाण्यावरील दावा ताकदीने मांडला नाही अशी चर्चा सुरू झाली. त्यांनी प्रतापराव जाधव यांच्या पारड्यात वजन टाकून त्यांना सोबत घेत दौरे सुरू केले.

हेही वाचा…आमच्यातील काही स्वार्थी लोक माझ्या विरोधात विषारी प्रचार करताहेत!…विजय वडेट्टीवार यांचा रोख कुणावर?

आता तर मागील दोन दिवसांपासून प्रतापरावांनी महायुती कार्यकर्ता संवाद मेळावे घेण्याचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाची यादी दिल्लीला पाठविली आहे. आज शनिवारी संध्याकाळी वा रात्री उशिरा महायुतीची संयुक्त किंवा स्वतंत्र यादी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावांची आजच्या मुहूर्तावर होणार हे जवळपास निश्चित आहे.

हेही वाचा…दिग्गजांना पराभूत करण्याचा नागपूरचा इतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आघाडीचा तिढा

दुसरीकडे बुलढाण्यातील आघाडीचा तिढा काही अंशी अजूनही कायम आहे. जागा ठाकरे गटाला सुटणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र सांगली मध्ये चंद्रहार पाटील यांची उमेदवारी सभेत जाहीर करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर यांचे ‘तिकीट’ का जाहीर केले नाही? असा रोखठोक सवाल ऐरणीवर आला आहे. अंतिम टप्प्यात काँग्रेस आक्रमक झाली आणि रामटेक व बुलढाणा अदलाबदलीच्या चर्चेने उचल घेतली. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत तर जयश्री शेळके मुंबईत तळ ठोकून आहे. ठाकरे गट उमेदवारीवरून संभ्रमित आहे. यामुळे होळी नंतर बुलढाण्याचा तिढा सुटून उमेदवार जाहीर होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे.