नागपूर : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. त्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी आहे. राज्यस्तरावर जरी महायुती असली तरी स्थानिक स्तरावर मात्र या तिन्ही पक्षात विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे. कधी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, तर कुठे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा वाद पाहायला मिळत आहे. त्यात आता भर म्हणून की काय शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्येही असाच वाद समोर आला आहे. हा वाद नागपूर जिल्ह्यात झालेला पाहायला मिळाला आहे.
प्रदीर्घ काळानंतर राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून लवकरच होणाऱ्या या निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाने शुक्रवारी जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. यानुसार ठाणे, रत्नागिरी, धुळे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, लातूर, वाशीम आदी १७ जिल्हा परिषदांमध्ये महिलाराज येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना सर्व पक्ष सक्रिय झाले आहेत यातच शिंदे सेनेचे मंत्री असलेले आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये भाजपने निवडणुकीत धोका दिल्यास वेगळी चूल मांडण्याची चर्चा करण्यात आली. त्यामुळे भाजपाने शिवसेनेमध्ये सारे काही अलबेल नाही अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने महायुतीचा प्रस्ताव नाकारला तर स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले राजकीय गट, संघटना व छोट्या पक्षांशी युती करायची व ताकदीने निवडणूक लढायची, असा निर्धार शिंदेसेनेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
जि. प. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच शिंदेसेना कामाला लागली आहे. निवडणुकींच्या तयारीसाठी शनिवारी रविभवन येथे शिंदेसेनेची बैठक झाली. तीत राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, उपनेते आ. कृपाल तुमाने, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार व विनोद सातंगे, शहरप्रमुख सुरज गोजे यांच्यासह युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. बैठकीत निवडणुकीतील पुढील धोरण, संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीत सक्षम उमेदवारांना संधी दिली जाईल. इच्छुक उमेदवारांनी आतापासून संघटनेसोबत मिळून नियोजन करण्याची सूचना आ. तुमाने यांनी केली.
नागपूर शहरात तीन शहर प्रमुख असून प्रत्येकाकडे दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय सामाजिक समीकरणे, इच्छुक उमेदवार यांची माहिती तयार करून ठेवा. युवासेना व महिलासेना मिळून २ यावर निर्णय घ्या. पुढील आठवड्यात याचा आढावा घेतला जाईल, अशी सूचना किरण पांडव यांनी केली. ज्यांना निवडणूक लढायची आहे, त्यांनी आजवरच्या कामाचा अहवाल तयार ठेवा, असेही पांडव यांनी स्पष्ट केले.