लोकसत्ता टीम

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘बटेंग तो कटेंगे’ अशा घोषणा दिल्या. त्यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील सरकारला ‘तोडफोड सरकार’ म्हटले आहे. तसेच विचारधारेवर न चालणाऱ्या पक्षाला अशाप्रकारे केवळ सत्ताप्राप्तीसाठी तोडफोड करून सरकार स्थापनेच्या अधिकार नसल्याची टीका केली. भाजप निवडणूक प्रचारातील भाषणातून लोकांना त्यांच्या खऱ्या समस्यांपासून लक्ष विचलित आणि दिशाभू करत आहेत. अशाप्रकारे भडकाऊ भाषण देऊन लोकांच्या भावना भडकवण्यापेक्षा केलेल्या कामांवर मत का मागण्याची धाडस का होत नाही, असा प्रश्नही खरगे यांनी केला.

आणखी वाचा-बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….

ते म्हणाले, योगी आदिनात्य यांची ‘बटेंग ते कटेंग’ ही घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवडली आहे. आता भाजपच्या लोकांमध्ये ही घोषणा देण्याची स्पर्धा लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ अशी नवी घोषणा दिली आहे. भाजपने निवडणुकीत नेमकी कोणाची घोषणा चालणार हे आधी ठरवावे.

काँग्रेस राष्ट्रभक्तांचा पक्ष आहे. त्याला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देशासाठी प्राण दिले आहे. संघाने महात्मा गांधी यांची हत्या केली. तसेच देशातील लोकांमध्ये फूट पाडली. म्हणजे मारणारे हेच विभाजन करणारेही हेच आहेत आणि हेच लोक दुसऱ्यांना दोष देत आहेत. आम्ही सर्व एक आहोत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देशासाठी प्राण गमावले. तुमच्याकडे एकतरी महापुरुष आहे काय, ज्याने देशासाठी प्राण गमावला, असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

आणखी वाचा-थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत असतात. खोटे बोला पण रेटून बोला असे त्यांचे चालू आहे. आम्ही त्यांना काळाधन आणणार होते कुठे आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार होते, ११ वर्षांत दहातरी कोटी लोकांना रोजगार दिल्या काय, नोटाबंदीमुळे दहशतवाद, काळापैसा संपला काय, महिलांवरील अत्याचार बंद झाले काय, असे विचारतो. त्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. पण, पंतप्रधानपदावर बसलेली व्यक्ती इतके खोटे बोलतात की आम्ही त्यांना आम्ही ‘झुटो का सौदागर’ असे संबोधतो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात युवकांच्या हाताला काम, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांना अमलीपदार्थाचा विळखा आणि महिला सुरक्षितता हे प्रश्न आहेत. महाराष्ट्र पूर्वी कायदा सुवस्था आणि न्याय व्यवस्थेसाठी ओळखले जात होते. आता अतिशय वाईट स्थिती आहे. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी चांगले सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे, असेही खरगे म्हणाले.