लोकसत्ता टीम

नागपूर: अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत हावरापेठ परिसरात गुरुवारी रात्री उशिरा दोन गटांच्या भांडणात एका सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. वर्चस्वाच्या वादातून हे प्रकरण घडले. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

अमोल मेहर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो हावरापेठ गल्ली क्रमांक २ मध्ये राहत होता. तो प्रॉपर्टी डीलिंगचे काम करत होता. अमोलवर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह बरेच गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी रात्री अमोल त्याच्या मित्रांसोबत हावरापेठ परिसरातील गल्ली क्रमांक ६ येथे बसला होता. त्याचवेळी आरोपी रजत उर्फ लल्ला शर्मा त्याचा भाऊ कार्तिक शर्मा, नितेश मस्के, सुनयन खर्चे व इतर साथीदार तेथे पोहोचले.

आणखी वाचा-मेळघाटातील चार गावांचा मतदानावर बहिष्‍कार, कारण काय? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुन्या वादातून आरोपींनी अमोलशी भांडण सुरू केले. काही वेळातच दोन गटात जोरदार हाणामारी झाली. शेवटी आरोपींनी अमोलवर धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेत रजत शर्मा आणि नितेश मस्के हेही जखमी झाले. अमोलला मेडिकलला हलवले. परंतु येथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिताफीने शोध घेत तीन आरोपी रजत शर्मा, नितेश मस्के आणि सुनयन खर्चे यांना अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. रजत शर्मा, कार्तिक आणि नितेश यांच्यावरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही घटना वर्चस्वाच्या लढाईतूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु पोलीस तपासातूनच खरी माहिती पुढे येणार आहे. हावरापेठ परिसरात तणाव निर्माण झाल्याने येथे अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.