नागपूर : सरकारच्या नियमाप्रमाणे १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सगळ्याच संवर्गातील वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाने आजपर्यंत चारदा मुदतवाढही दिली. त्यानंतरही राज्यात निम्याही वाहनांना या पाट्या लागल्या नाही. त्यामुळे मुदत संपल्यावर पाटी न लावणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्हा असलेल्या नागपुरातील या पाटीबाबतची महत्वाची अपडेट आपण जाणून घेऊ या.

नागपूर जिल्ह्यातील आकडेवारी बघितल्यास नागपुरात नागपूर जिल्ह्यातील तिन्ही आरटीओ कार्यालयांतील वाहनचालकांकडून नंबरप्लेट बसवण्यासाठी नागरिक अनुत्साही असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत केवळ ३६.२३२ टक्के वाहनांनाच नवीन नंबरप्लेट बसवण्यात आल्या आहेत. नवीन नंबरप्लेट भारतातील सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे. याचा उद्देश रस्ता सुरक्षा सुधारणे आणि वाहनचोरीला आळा घालणे आहे.

या नंबरप्लेटमुळे बनावट प्लेट्सशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणे शक्य असल्याचा परिवहन विभागाचा दावा आहे. सरकारने १ एप्रिल २०१९ नंतरच्या वाहनांमध्ये ही पाटी लावून येत असली तरी त्यापूर्वीच्याही वाहनांना नंबरप्लेट बंधनकारक केली गेली. या नंबरप्लेटसाठी राज्य शासनाच्या परिवहन खात्याने दुचाकी, चारचाकीसह इतर वाहनांच्या नंबरप्लेटबाबत दर व खासगी कंत्राटदार निश्चित केला. त्यानुसार राज्याच्या सगळ्याच जिल्ह्यात निश्चित केंद्रात ऑनलाईन अपाॅईंटमेंट घेऊन ही पाटी लावली जात आहे.

नागपुरातील आकडे काय बोलतात…

नागपूर जिल्ह्यात शहर, पूर्व नागपूर आणि नागपूर ग्रामीण ही तीन आरटीओ कार्यालय आहे. या तिन्ही कार्यालयांमध्ये पंधरा वर्षांच्या आत व हरित कर भरून पुनर्नोंदणी केलेली एकूण १४ लाख ३५ हजार ४७३ वाहने आहेत. त्यापैकी ६ लाख १५ हजार १४१ वाहनांनी नंबरप्लेटसाठी पैसे भरून नोंदणी केली. त्यापैकी ५ लाख २० हजार १११ वाहनांना पाट्या लागल्या आहेत.

आजपर्यंत चार वेळा मुदतवाढ…

महाराष्ट्रामध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठीची पहिली अंतिम मुदत पूर्वी ३१ मार्च २०२५ होती, त्यानंतर ३० जून २०२५, १५ ऑगस्ट २०२५ अशी मुदतवाढ दिली गेली. तर आता ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत असून त्यानंतरही पाटी नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा परिवहन विभागाचा दावा आहे.

कार्यालयनिहाय पाटी लावलेल्या वाहनांची संख्या असलेला चार्ट…

कार्यालय एकूण वाहने पाटी लागलेली वाहने

नागपूर शहर ४,३७,३१३ १,५६,१२१

पूर्व नागपूर ४,३५,१६० १,६३,९९०

नागपूर ग्रामीण ५,६३,००० २,००,०००