देवेश गोंडाणे

नागपूर : मणिपूरच्या वांशिक हिंसाचाराची झळ बसलेले विद्यार्थी-विद्यार्थीनी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी धडपडत आहेत. मात्र, पुरेशा कागदपत्रांअभावि त्यांना प्रवेश देताना विद्यापीठांना अडचणी येत असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगासह अन्य सरकारी यंत्रणांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी महाराष्ट्रातील संघटनांनी केली आहे.     

मणिपूर आजही धगधगत असल्याने तेथील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून काही सामाजिक आणि विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आहेत. त्या मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर, गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या संपर्कात मणिपूरचे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी आहेत. त्यापैकी अनेकांची घरे आणि शैक्षणिक कागदपत्रेही जळाली आहेत. विद्यापीठांनी त्यांना तात्पुरता प्रवेश द्यावा आणि आवश्यक कादपत्रे सादर करण्यासाठी वेळ द्यावा. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) तशा सूचना विद्यापीठांना द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रशांत तांबे यांनी केली आहे.

नागपूर, अमरावती, गडचिरोलीसह अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इम्फाळ येथील केंद्रीय विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनेकांचा समावेश आहे. काही विद्यार्थी पदवीच्या दुसऱ्या वर्षांला तर काही पदव्युत्तरच्या पहिल्या, दुसऱ्या सत्रात होते. दंगलीमुळे त्यांना आपले राज्य सोडावे लागले. हिंसाचार कधी थांबेल, हे सांगणे कठीण असल्याने अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत.

महाराष्ट्राची परंपरा

स्वातंत्रपूर्व काळात ‘वंदे मातरम’ चळवळीत भाग घेतल्याने उम्मानिया विद्यापीठाने माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्यासह सुमारे ५०० विद्यार्थ्यांना निष्कासित केले होते. इंग्रजी राजवट असतानाही कुलगुरू लेफ्टनंट जनरल टी. जे. केदार यांनी त्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठात प्रवेश दिला होता. या गौरवशाली इतिहासाची परंपरा असल्यानेच इशान्येतील विद्यार्थी नागपूर, गडचिरोली, अमरावतीसह अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेशाला पसंती देतात.

विद्यार्थ्यांची आपबिती..

मोलनोम टर्फ हा इम्फाळ येथील मणिपूर केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहात राहून तो पीएच.डी करीत होता. मात्र, त्याच्यासह सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले. त्याची आणि त्याच्याबरोबरच्या अनेकांची कागदपत्रे जाळण्यात आली. ते वसतिगृह सोडून मूळ गावी गेले. मात्र, तेथील परिस्थिती आणखी भयावह होती. कुटुंबाला गावातून बाहेर काढण्यात आले होते. घरातील मंडळी सरकारी शिबिरांमध्ये होती. त्यामुळे काही विद्यार्थी पुढील शिक्षणाच्या आशेने राज्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात आले.

पदोपदी संघर्ष.

मणिपूरच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. विद्यापीठात जाणे शक्य नसल्याने त्यांनी ऑनलाईन प्रमाणपत्रे काढून घेतली. मात्र, स्थानांतर प्रमाणपत्र आणि पात्रता प्रमाणपत्राचा पेच कायम आहे. या कागदपत्रांमुळे त्यांना महाराष्ट्रातील विद्यापीठांत प्रवेश नाकारला जात आहे. काहींची कागदपत्रे हिंसाचारात जळाली आहेत. ती मिळवण्यासाठी वेळ लागणार आहे.

आम्ही नागपूर विद्यापीठात प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र स्थानांतर प्रमाणपत्र आणि पात्रता प्रमाणपत्र आणणे सध्या शक्य नाही. त्यासाठी मणिपूर विद्यापीठात गेल्यास जीवाला धोका आहे. अनेक विद्यार्थ्यांची हीच अडचण आहे. त्यांत बहुतांश मुलीही आहेत. – मोलनोम टर्फ, विद्यार्थी 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मणिपूरमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास काहीही अडचण नाही. त्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि कायदेशीर बाबी तपासून प्रवेश देता येऊ शकतो. – डॉ. राजू हिवसे, कुलसचिव, ‘रातुम’ नागपूर विद्यापीठ