अकोला: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणारे मनोज जरांगे पाटील यांची अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
१५० एकरवर ही सभा होणार असून त्यांच्या सभा असल्याने ग्रामस्थांनी रब्बी हंगामात शेतात पेरणी केली नाही. विदर्भातील ही सर्वात मोठी सभा होणार असल्याचा दावा आयोजक सकल मराठा समाजाच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन छेडणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करून सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ दिला. त्यानंतर राज्यभरात दौरा प्रारंभ केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा ‘समाज बांधव गाठी-भेटी दौरा’ सध्या तीन टप्प्यांमध्ये सुरू आहे. या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील ४ डिसेंबरला मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव येथे समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन सायंकाळी शेगाव येथे मुक्काम करतील.
हेही वाचा… चंद्रपुरच्या प्रदुषणात नोव्हेंबरमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या कारणे व दुष्परिणाम
त्यानंतर ५ डिसेंबरला अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील चरणगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. याच दिवशी वाशीम आणि हिंगोली येथेही त्यांची उपस्थिती राहील. सकल मराठा समाजाच्यावतीने चरणगावात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी सुरू आहे. १५० एकरवर ही सभा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. सभेसाठी गावात येणाऱ्यांसाठी तीन ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली. सभेच्या नियोजनासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या सभेसाठी लाखोंच्या संख्येने गर्दी जमणार असल्याचा दावा आयोजकांनी केला.
३४ दिवसांपासून साखळी उपोषण
अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल ३४ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील, असे चरणगाव येथील आंदोलकांनी सांगितले.