यवतमाळ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड, महागाव, पुसद या तालुक्यात मराठा समाजाची संख्या लक्षणीय आहे. ज्यांना मुंबईला जाणे शक्य नाही ते गावातच आंदोलन करून जरांगे यांना पाठिंबा देत आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी महागाव येथे आज सोमवारी एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नागपूर–तुळजापूर महामार्गावर हे आंदोलन आज सकाळी पार पडले. या आंदोलनामुळे नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला पाठिंबा दर्शवत सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला.

जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला. तत्काळ निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत शांतता राखली. आंदोलन शांततेत पार पडले, तरी महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी सुनावणी झाली. मात्र आता पुढील सुनावणी उद्या होणार आहे. मात्र मराठा समाजाचे हे आंदोलन दडपण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा आरोप महागाव येथे रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केला. मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून शेकडो मराठा बांधव निघाले आहेत. अनेकजण मुंबईत तळ ठोकून आहेत. आता सरकारने निर्णय घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असे मागवा येथील आंदोलकांनी सांगितले.

आंदोलक कायदा पाळून वाहत असतानाही मुंबई येथे त्यांची जाणीवपूर्वक गैरसोय केली जात असल्याचा आरोप रास्ता रोको आंदोलनात करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी, सरकारने गोळ्या घातल्या तरी निर्णय घेतल्याशिवाय आझाद मैदानातून उठणार नाही, असा निश्चय केला आहे. सरकारने मराठा समाजाला न्याय न दिल्यास आंदोलनामुळे मुंबई ठप्प होईल, असा इशाराही या आंदोलना दरम्यान देण्यात आला.

या आंदोलनात महागाव तालुक्यातील असंख्य मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत शांततेत आंदोलन केले. मात्र निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.