वर्धा : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन वर्धेकरांना हळहळ लावून गेले. त्यांच्या साहित्याने वन्यप्रेमींच्या अनेक पिढ्या घडविल्या. वृक्ष व वन्यजीवांच्या प्रजातींचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, निरीक्षणे, नोंदी तसेच आदिम संस्कृतीतून जन्मास आलेल्या अनेक किंवदंती, लोककथा हे सर्व त्यांनी त्यांच्या ग्रंथातून जिवंत साकारले. येथेच बऱ्यापैकी लिहले.तीन वर्षाच्या त्यांच्या येथील वास्तव्यात ते पुरते इथलेच होऊन गेले होते. त्यांच्या प्रेरणेनेच शहरपक्षी घोषित झाला. चारोळी बाग फुलली. पक्षी सप्ताह घोषित झाला. आता त्या आठवणीचा गहिवर आला आहे.
हिंदी विद्यापीठात त्यांचे वास्तव्य असतांना त्यांचे केअर टेकर म्हणून रितेश निमसडे यांच्याकडे जबाबदारी होती. चितमपल्ली यांना शुगर त्रास मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागत. फावल्या वेळात चर्चा. निमसडे म्हणतात असेच एकदा मी त्यांना विचारले की सर तुम्ही निबीड अरण्यात एकट्याने भ्रमंती करायचे. अशा वेळी तुमच्यावर हिंस्त्र प्राणी हल्ला करायचे कां ? या प्रश्नावर चितमपल्ली हसत म्हणायचे की मुळीच नाही. कधीच असा प्रसंग आठवत नाही. कारण हे प्राणी मला त्यांच्यातीलच एक मानायचे. आपलेच आपणांस कसा त्रास देणार. इतक्या वर्षाच्या भ्रमांतीत मी त्यांचाच होऊन गेलो होतो. ते मला व मी त्यांना समजून घ्यायचो. प्राणी पण वाचता, समजता आला पाहिजे. शत्रू नव्हे तर सखा म्हणून बघा. ते लळा लावतील, असा हितोपदेश चितमपल्ली यांनी केल्याचे निमसडे सांगतात.
बहार या पक्षीप्रेमी संस्थेच्या काही कार्यक्रमांना चितमपल्ली यांची हजेरी लागली होती. संस्थेचे संजय इंगळे तिगावकर सांगतात की बहारच्या पहिल्या शेतकरी पक्षीमित्र संमेलनाचे उदघाटन त्यांनी केले होते. तसेच वर्धा नगरीचा शहरपक्षी म्हणून नीलपंख निवडून आल्याची घोषणा पण त्यांनी ईथे केली होती. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून आमच्या संस्थेने मागणी रेटून धरली होती आणि ते पूर्ण पण झाली. ५ नोव्हेंबर हा त्यांचा तर १२ नोव्हेंबर ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन. हे औचित्य साधून सेवाग्राम येथील पक्षीमित्र संमलेनात ५ ते १२ नोव्हेंबर हा महाराष्ट्र पक्षीमित्र सप्ताह जाहीर करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. आणि २०१७ साली राज्य सरकारने तशी घोषणा पण केली. असे चितमपल्ली व वर्धा नाते गहिरे असल्याचे तिगावकर सांगतात.
निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे म्हणतात की चितमपल्ली यांचे वास्तव्य वर्धेच्या निसर्गास समृद्ध करून गेले. ते आमच्या हिरवळीने फुललेल्या ऑक्सिजन पार्कला बरेचदा येऊन गेले होते. त्यांच्याच सूचनेने मी पेंचला जाऊन आदिवासी शेतकऱ्यांकडून दुर्मिळ बियाणे आणलीत. ड्रायफ्रूट चारोळी ही वनस्पती दुर्मिळ होत चालली. त्याचे बीज आणले व पार्कला लावले. अन्य दुर्मिळ बीजे आणली व ती लागल्यानंतर त्यास मारुती चितमपल्ली चारोळी बाग असे नाव दिले. या बागेत एका वृक्षवर बोर्ड लावला व त्यात क्यू आर कोड दिला. त्यातून चितमपल्ली यांची ग्रंथ संपदा व अन्य माहिती चटकन उपलब्ध होते. आता चारोळीची भरपूर रोपे झाली असून हे त्या वन महर्षीचेच हिरवं देणं होय, अशी कृतज्ञता बेलखोडे व्यक्त करतात.