नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवनी येथील अरण्यपुत्र माधवराव पाटील आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यातील नातेसंबंध माहिती नसलेला व्यक्ती दुर्मिळच. २००६ मध्ये माधवरावांचे निधन झाले. माधवझरी परिसरात त्यांचा दफनविधी झाला. माधवरावांच्या निधनानंतर चितमपल्ली अस्वस्थ झाले आणि त्यांनी धाबेपवनीलाच राहण्याचा निर्णय घेतला. माधवरावांचा अंत्यविधी जिथे पार पडला त्याच्या बाजूला माझ्या मृत्यूनंतर माझ्याही अस्थी पुरण्यात याव्यात, ही त्यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी चितमपल्ली यांचे कुटुंबीय सरसावले आहेत. सोलापूरहुन पुणे आणि पुण्याहून नागपूर असा विमानाने प्रवास करत या अस्थी आज नागपुरात पोहचणार आहेत. येथून त्या अस्थी धाबेपवणीत नेण्यात येतील.

सहाय्यक वनसंरक्षक म्हणून नवेगाव बांध येथे वनखात्यात मारुती चितमपल्ली रुजू झाले. १९७५ च्या तो काळ होता आणि नवेगाव बांध येथे पाऊल टाकल्यानंतर त्यांची निसर्गाचा दांडगा अभ्यास असणा-या माधवराव पाटील डोंगरवार यांच्याशी ओळख झाली. त्यांचा मुक्काम हा त्यावेळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेपवणी येथील माधवराव पाटलांकडेच होता. चितमपल्ली यांनी जंगल आणि वन्यजीवांचे बारकावे आणि निसर्गनिरीक्षणाच्या पद्धती माधवराव पाटील यांच्याकडून समजून घेतल्या आणि तेथून त्यांच्यात गुरुशिष्यांचे नाते तयार झाले.

माधवराव पाटलांच्या मृत्यूने अरण्यऋषी अस्वस्थ झालेत. त्यावेळी आपल्या मृत्यूनंतर आपल्याही अस्थी त्यांच्या शेजारीच दफन करण्यात याव्यात अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. त्या इच्छेची आठवण ठेवून चितमपल्ली यांच्या कुटुंबीयांनी सोलापूरहून शुक्रवारी त्यांच्या अस्थी विमानाने पुणेमार्गे नागपुरात पाठवल्या.

आज या अस्थी नागपुरात पोहोचणार असून तेथून त्या गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवणी येथे पाठवण्यात येतील. तत्पुर्वी वर्धा येथे मारुती चितमपल्ली काही काळ वास्तव्यास असल्याने त्याठिकाणी देखील अस्थी नेण्यात येतील. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील धाबेपवनी गावाजवळील माधवझरी येथे त्यांच्या गुरूंच्या शेजारी म्हणजेच माधवराव पाटील डोंगरवार यांच्या समाधीशेजारी अस्थिकलशाचे दफन होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चितमपल्ली यांचे जावई सुभाष बोयने हे अस्थिकलश घेऊन पुण्याला गेले. तेथून विमानाने तो नागपूरला पाठविला असून, चितमपल्ली यांचे वर्धा येथील सहकारी कौशल मिश्रा हे हा अस्थिकलश घेऊन दफन करण्यासाठी माधवझरी येथे घेऊन जाणार आहेत.