नागपूर : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने (एम.सी.आय.एम.) ऑनलाईन परिषदेद्वारे ‘क्रेडिट पाॅईंट’च्या नावावर आयुर्वेद व युनानी डॉक्टरांच्या नोंदणीसाठी प्रत्येक पाच वर्षांत ३० हजार रुपये आकारण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे आयुर्वेद डॉक्टरांची निमा ही संघटना संतापली आहे.

आयुर्वेद (बीएएमएस) व युनानी (बीयूएमएस) डॉक्टरांना एम.सी.आय.एम.कडे नोंदणी बंधनकारक आहे. प्रत्येक पाच वर्षांत नूतनीकरण केले जाते. पूर्वी या नूतनीकरणासाठी आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना प्रत्येक पाच वर्षांत ५०० रुपये शुल्क लागत होते. परंतु, काही वर्षांपूर्वी हे शुल्क २ हजार रुपये करण्यात आले. यावर आयुर्वेद डॉक्टरांच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) आक्षेप नोंदवला होता. या वाढीव शुल्काबाबत अद्याप निमाकडून लढा सुरू आहे. निमाने न्यायालयातही आव्हान दिले आहे.

दरम्यान, एमसीआयएमकडून आयुर्वेद व युनानी डॉक्टरांचे ज्ञान वेळोवेळी अद्ययावत करण्यासाठी कार्यशाळा, परिषदा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे. या कार्यशाळा व परिषदेला उपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांना ‘क्रेडिट पाॅईंट’ दिले जाणार आहेत. प्रत्येक पाच वर्षांत ५० ‘क्रेडिट पाॅईंट’ बंधनकारक आहेत. यासाठी एमसीआयएमकडून शुल्क आकारले जाणार आहे. त्यात प्रत्येक क्रेडिट पाॅईंटवर ६०० रुपये असे प्रत्येक पाच वर्षांत ३० हजार रुपयांची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे आधीच प्रत्येक पाच वर्षांत २ हजार रुपये वाढीव शुल्काला विरोध करणाऱ्या निमाकडून या क्रेडिट पाॅईंटवरील शुल्कावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, ॲलोपॅथी डॉक्टरांना मात्र प्रत्येक पाच वर्षांत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीसाठी केवळ ५०० रुपये शुल्क भरावे लागते. त्याहून कमी शुल्क आयुर्वेद व युनानी डॉक्टरांना अपेक्षित असताना उलट या डॉक्टरांची लूट सुरू असल्याचा आरोपही निमा संघटनेने केला आहे.

डॉक्टरांची गैरसौय होऊ नये म्हणून प्रयत्न- डॉ. वांगे

‘एम.सी.आय.एम.’ने आयुर्वेद व युनानी डॉक्टरांच्या ज्ञानात वेळेनुरूप भर पडावी म्हणून ‘क्रेडिट पाॅईंट’ पद्धत सुरू केली आहे. राज्यातील आयुर्वेद व युनानी डॉक्टरांची भविष्यात गैरसोय होऊ नये म्हणून वेळेनुरूप त्यात दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे प्रबंधक डॉ. डी.यू. वांगे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरंची लूट थांबली नाही तर आंदोलन- डॉ. बोथरा

‘एम.सी.आय.एम.’ने केंद्रीय आयुष मंत्रालयाचा दाखला देत प्रत्येक पाच वर्षांत एका ‘क्रेडिट पाॅईंट’वर ६०० रुपये प्रमाणे ५० ‘क्रेडिट पाॅईंट’वर ३० हजार रुपयांची वसुलीचा नियमबाह्य निर्णय घेतला आहे. त्याला निमाचा विरोध आहे. तातडीने हा निर्णय मागे घेत निमातर्फे आयोजित सीएमईलाही ‘क्रेडिट पाॅईंट’ मंजूर करून तेही ग्राह्य धरून आयुर्वेद डॉक्टरांची लूट थांबवावी. या विरोधात निमा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निमाचे राष्ट्रीय सल्लागार डॉ. रवींद्र बोथरा यांनी दिला.