नागपूर : राज्यात बेकायदेशीर खाणकामाचा आलेख वाढतच असून खनिज संपत्तीची लूट सुरू आहे. माहितीच्या अधिकारातून राज्यभरातील एकूण कारवाईची प्रत्येक वर्षीची वाढती आकडेवारी बघता हा धक्कादायक तपशील पुढे आला आहे. या लुटीबाबत आपण जाणून घेऊ या.

महाराष्ट्रात बॉक्साईट, अगेट, चुनखडी, कोळसा, लोहखनिज, मँगनीज, चुनखडी, सिलिका वाळू, कायनाईट, सीलिमनाईट, क्रोमाईट, इलमेनाईट, डोलोमाईट, तांबे, टंगस्टन, जस्त, सोपस्टोन, क्वार्टझ, अगेट, क्ले, बेराईट, ग्रॅफाईट फ्लोराईट इत्यादी खनिजे आढळून येतात. या खनिजांपासून केंद्र व राज्य सरकारला मोठा महसूलही मिळतो. परंतु, बेकायदेशीर खाणकामातून या खनिजांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारचा कोट्यावधींचा महसूलही बुडत आहे.

राज्यातील खनिज संपत्तीची लूट थांबवण्यासाठी शासनाकडून राज्यात कारवाया वाढवण्यात आल्या आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्यातील ३५ जिल्हे, शहरात तब्बल ५,९४६ बेकायदेशीर खाणकामाची प्रकरणे उघडकीस आली. याबाबतचा जप्त मुद्देमाल ८३ कोटी २९ लाख ७१ हजार रुपयांचा होता. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८,८२५ बेकायदेशीर खाणकामाची प्रकरणे समोर आली. यातील जप्त मुद्देमाल ११६ कोटी ४३ लाख ९७ हजार रुपयांचा आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हा तपशील समोर आणला आहे. भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर येथील उपसंचालक व जन माहिती अधिकारी रो. रा. मेश्राम यांनी ही माहिती उपलब्ध केली आहे.

खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात?

राज्यातील खनिजे प्रामुख्याने विदर्भ खोऱ्यात आणि कोकणात आढळतात. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात केंद्रित आहे. पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली भंडारा नागपूर गोंदिया आणि यवतमाळ हे खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खनिजांचे उपयोग काय?

आपल्या दैनंदिन जीवनात खनिजांचे अनेक उपयोग आहेत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो त्या विविध उत्पादनांच्या निर्मितीमध्ये खनिजे वापरली जातात. काच, मातीची भांडी, सिमेंट, पेंट्स इत्यादी काही सामान्य उदाहरणे आहेत. वाळू (खनिज) सोडा राख आणि चुनखडी (दोन्ही खनिजे देखील) मिसळून ग्लास तयार केला जातो.