नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ तास काम करतात. आता ते प्रयोग करतायत. ज्यात त्यांना झोपावे लागणार नाही. अशी साधना ते करत आहेत. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान करत असलेल्या नवीन प्रयोगाची माहिती दिली होती. काहींनी मोदी अठरा तास काम करतात असाही दावा केला होता. मात्र, आता याही पुढे जात राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काम करण्याची प्रचंड ताकद आहे. ते इतके जबरदस्त नेतृत्व आहे की दिवसरात्र काम करतात. २४ तास कामामध्येच राहतात. कधी झोपतच नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे मोदींनंतर इतके तास काम करणारे एकनाथ शिंदे असल्याची चर्चा रंगली आहे.
रविवारी नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे शिवसेना संघटन अभियानाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सामान्य शिवसैनिकांच्या अथक मेहनतीमुळे पाचव्यांदा विधानसभेत जाण्याचे भाग्य लाभले, असे नमूद केले. पुढे बोलताना शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या ताकदीशिवाय आमदार निवडून येऊ शकत नाही, ही भावना जनमानसात दृढ झाली पाहिजे, असे सांगितले. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनसामान्यांचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी संकटकाळात जनतेच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या मनावर आपले नाव कोरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेनेला अधिक बळकट आणि व्यापक केले पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक विभागातून आपले उमेदवार उभे करून त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न केले पाहिजेत, अशी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
नेमके काय म्हणाले राज्यमंत्री
आशिष जैस्वाल म्हणाले की, खऱ्या भगव्यामध्ये जी ताकद आहे ती कशातच नाही. तुम्ही कशलीही चिंता करू नका. निवडणुका येतील आणि जातील मात्र, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये लक्ष देण्याची ताकद ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आहे. त्यांच्यामध्ये कमालीची ताकद आहे. जबरदस्त नेतृत्व गुण आहे. ते दिवसरात्र काम करत असतात. कधी झोपतच नाही. पक्षावर कुणाचा अधिकार आहे. वडीलांच्या संपतीवर मुलाचा अधिकार असतो. मात्र, पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो. त्यामुळे ज्याच्याकडे अधिक बळ असते, कार्यकर्ते अधिक असतात त्याचा पक्ष असतो. काँग्रेस फेक नॅरेटीव्ह पसरवतात. परत आता ओबीसीची भानगड सुरू केली. ओबीसीचे आरक्षण काँग्रेसने घालवले होते आणि आता तेच ओबीसींसाठी आंदोलन करतात. जाती धर्मामध्ये भेद निर्माण करणे आणि हिंदू विभाजीत करण्याचे काम काँग्रेस करते. पक्षकडून सूचना आहेत की महायुती म्हणून निवडणूका लढवायच्या आहेत. मात्र, जर आपल्यासोबत गडबड झाली तर आपण प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे ठेवण्याची ताकद ठेवूया. आपण उमेदवार निवडून ठेवण्याची तयारी ठेवा, असे आवाहनही आशिष जैस्वाल यांनी केले.