बुलढाणा : राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) सक्रिय असून, महायुतीतील घटक पक्ष म्हणून भूमिका बजावत आहे. माझ्यावर मंत्रिपदाची जबाबदारी असून केंद्रात मला मंत्रिपद देण्यात आल्याने कार्यकर्ते खुश आहेत. मात्र, केंद्रात व राज्यात महायुतीची सत्ता असताना देखील आमच्या कार्यकर्त्यांना महायुतीमध्ये काहीच मिळत नाही, अशी मनस्वी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी येथे बोलून दाखविली.नजीकच्या काळात किमान दोन महामंडळांचे अध्यक्षपद रिपब्लिकन पक्षाला मिळाले पाहिजेत, अशी अपेक्षाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज रविवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा त्यांनी आढावा घेतला. विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकशाहीर अन्ना भाऊ साठे यांच्या जंयती उत्सवानिमित्त शेगाव येथे आयोजित कार्यक्रमानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री आठवले बुलढाणा जिल्ह्यात आले होते. कार्यक्रमानंतर बुलढाणा शहरातील शासकीय विश्रामगृहात रामदास आठवले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना राज्यमंत्री आठवले म्हणाले, माझ्या मंत्रिपदावर कार्यकर्ते खुश आहेत, पण कार्यकर्त्यांनादेखील संधी मिळाली पाहिजेत. त्या अनुषंगाने आगामी निवडणुकीनंतर आरपीआयला दोन तरी महामंडळे मिळावी, अशी चर्चा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली आहे.

इतकेच नाही तर, राज्याच्या मंत्रिमंडळात एक मंत्रिपद रिक्त असून आमच्यासाठीचे ते ठेवलेले असावे, अर्थात ते आम्हाला मिळावे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली. पत्रकार परिषदेत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, रिपाईंचे (आठवले गट) राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम, विदर्भ संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

‘त्या’ अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याय नाही

यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आपल्या खास पद्धतीने उत्तरे दिली. मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय (अध्यादेश) ओबीसींवर अन्यायकारक ठरणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांनाच याचा लाभ होणार असून हा निर्णय ओबीसींवर अन्यायकारक ठरणार नाही, असा दावा त्यांनी केला. कॉँग्रेसने आजवर केवळ आरोप केले, दुसरे काहीच केले नसल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.