यवतमाळ : वणी परिसरात सिमेंट रस्त्याचे काम करणाऱ्या चंद्रपूर येथील एका कंत्राटदारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी चार टक्के कमिशन स्वरूपात तब्बल नऊ कोटी ५० लाखांची खंडणी मागितली. कंत्राटदाराच्या मुलास व कर्मचाऱ्यांस धमकावत १० लाख रूपये स्वीकारले. या प्रकरणी योगेश जयंत मामीडवार (रा. चंद्रपूर) यांच्या तक्रारीवरून राजू उंबरकर यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले ओहत. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
योगेश मामीडवार यांचे वडील जयंत मामीडवार यांचा चंद्रपूर येथे गजानन कन्स्ट्रक्शन या नावाने व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीकडे वणी तालुक्यातील शिबला-वणी – नांदेपेरा या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम आहे. तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी राजू उंबरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कामाच्या जागी जाऊन मामीडवार यांच्या कंपनीचे उपव्यवस्थापक अजय हिंगाणे, निरपेंद्र पटेल, सागर तन्नेरवार, कुलदीप पांडे व आकाश उइके या कर्मचाऱ्यांना धमकावून मारहाण केली. या घटनेची नोंद वणी पोलिसांत झाली. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी योगेश मामीडवार हे व्यवस्थापक अजय हिंगाणे यांच्यासोबत उंबरकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले.
तक्रारीनुसार, उंबरकर यांनी यावेळी योगेश मामीडवार यांना ‘तुमचे काम माझ्या परिसरात सुरू आहे. त्या कामातून मला चार टक्के कमिशन (नऊ कोटी ५० लाख रुपये) मिळाले पाहिजे. अन्यथा तुमचे काम बंद पाडले जाईल’, अशी धमकी देवून योगेश यांच्याकडून दहा लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारले. दहा लाखांची खंडणी घेऊन, नऊ कोटींची रक्कम देण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी उंबरकर यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार योगेश मामीडवार यांनी वणी पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी वणी पोलिसांनी राजू उंबरकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत.
सर्व फोन कॉलची तांत्रिक चौकशी करून कंत्राटदारास धमकी देणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधातही खंडणीची गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींबाबत सातत्याने राज्य सरकारचे कान टोचणारे मनसे प्रमुख राज ठाकरे आता खंडणी मागणारे त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.