चंद्रपूर: गुन्हेगारी विश्वात वर्चस्व व दबदबा निर्माण करण्यासाठी दरोडा टाकुन मिळालेल्या पैशातून खूनासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या २ माऊझर गन (पिस्टल), २ देशी कटट्टे, ३५ नग जिवंत काडतुस, तसेच ४ लोखंडी धारदार खंजर असे घातक साहित्यासह अटक केलेल्या बल्लारपूर येथील कुख्यात गुंडाचा टोळी प्रमुख चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी, येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक व त्याचे इतर साथीदार अशा दहा जणांविरूध्द संयुक्तरित्या मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या या कारवाईने गुन्हेगारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

औद्योगिक नगरी चंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अग्निशस्त्राचा वापर करुन, घातक व तिक्ष्ण हत्याचाराचा वापर करुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, गैरकायद्याची मंडळी, खंडणी, शासकीय कामात अडथळा, मालमत्तेचे नुकसान करुन सर्व सामान्य जनतेत दहशत निर्माण करणे आदी विविध गुन्हे दाखल असलेल्या बल्लारपूर येथील कुख्यात गुंड टोळी प्रमुख चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी व येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक व साथीदारांनी संयुक्तरित्या असंख्य संघटीत गुन्हे केले.

या टोळीला गंज वार्डात २ माऊझर गन (पिस्टल), २ देशी कटट्टे, ३५ नग जिवंत काडतुस, तसेच ४ लोखंडी धारदार खंजर असे घातक हत्यारासह दरोडा टाकण्याचे बेतात अटक करण्यात आली. सदर टोळी दरोडा टाकुन प्राप्त पैशातून खुना सारखा गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत असल्याचे दिसून आले. या गुन्हयातील कुख्यात टोळी प्रमुख चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी व येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक याचे नेतृत्वात स्वतःच्या टोळीचा वर्चस्व निर्माण करण्यासाठी खून करण्याचा प्रयत्न करणे, आपखुशीने गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, अश्लिल शिवीगाळ करणे, दंगा करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक रस्त्यामधील मार्गात अटकाव करणे, प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे, मनाई आदेशाने उल्लंघन करणे इत्यादी शिर्षकाखाली गंभीर गुन्हे केले आहे.

या टोळीचे वर्चस्व व दहशत राहावी म्हणुन त्याद्वारे मिळणारे पैश्यावर ऐशआरामाचे, चैनीचे जीवन जगत आहेत. या टोळीचा प्रमुख चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी (२३), येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक (२७) , मुकेश राजु वर्मा(२०), अमीत बालकृष्ण सोनकर (२६), गौरिश श्रीनिवास कुसमा (१९), अनवर अब्बास शेख (२३) जथा इतर साथीदार अशा दहा जणांविरूध्द मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोउपनि संतोष निंभोरकर, अरुण खारकर व गजानन नन्नावरे व मोक्का पथकाने केलेली आहे.