बुलढाणा : अवैध सावकाराने अर्धा एकर शेतीसाठी केलेला छळ असह्य झाल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबाने रुग्णालयातच ठिय्या धरल्यावर अखेर पोलिसांनी सावकाराला गजाआड केले.

सुधाकर मिसाळ (५५, रा. शेळगाव आटोळ, ता. चिखली) असे आत्महत्या करण्याऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा आरोपी सावकार अनिल दौलत तिडकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एसटी महामंडळातून निवृत्त झालेला अनिल तिडके अवैध सावकारीचा व्यवसाय करत असे. त्याच्याकडून कर्ज घेताना मिसाळ यांनी त्याच्या नावे अर्धा एकर जमीन लिहून दिली होती. व्याजासह कर्जफेड केल्यावर ती जमीन पुन्हा मिसाळ यांच्या नावावर करून देण्याचा व्यवहार ठरला होता. मात्र, कर्जाची सव्याज फेड केल्यावरही तिडके याने जमीन नावे करण्यास टाळाटाळ केली. त्यातून होणारा मनस्ताप असह्य झाल्याने सुधाकर मिसाळ यांनी शेतात जाऊन विष प्राशन केले.

हेही वाचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘ती’ घोषणा, अन् जिल्ह्यात श्रेयवादाची लढाई

हेही वाचा – गोंदिया : रस्ते खडीकरणाच्या श्रेयावरून आजी-माजी आमदारांमध्ये चढाओढ; एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी त्यांचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त मिसाळ परिवाराने, जोपर्यंत सावकाराविरोधात कारवाई होत नाही, तोपावेतो मृतदेह हलविणार नाही, असे सांगत तिथेच ठिय्या धरला. दरम्यान, रात्री पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिडकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर मिसाळ यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आला.