वर्धा : शनिवारी झालेल्या एका अपघातात हेमंत निंभोरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते जिल्हा भाजपचे सरचिटणीस कमलाकर निंभोरकर यांचे बंधू होते. रविवारी आष्टी येथे शेकडोच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र असा चटका लावणारा व मृतकाचा कसलाच दोष नसतांना ओढवलेला मृत्यू संताप व्यक्त करणारा ठरत आहे. कारण या प्रकरणी आरोपीस वाचविण्याचा झालेला कथित प्रयत्न.
हेमंत निंभोरकर हे दुचाकीने मोर्शीवरून लिंगापूर येथे येत होते. पिंगलाई मातेच्या दर्शनासाठी ते गेले होते. वाटेत खुल्या कारागृहसमोर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीने त्यांच्या गाडीस जबर धडक दिली. त्यात हेमंत हे जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले सहकारी उमेश गोडबोले गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारार्थ अमरावती येथे दाखल करण्यात आले. धडक देणारा यश पवार (२०) हा निष्काळजीपणे वाहन चालवीत असल्याचे दिसून आले.
आरोपी यश हा त्याच्या प्रेयसीसह दुचाकीवर बसून अप्पर वर्धा धरणावर फिरायला आले होते. परत येत असतांना तो वेगात दुचाकी चालवीत होता. त्याने निंभोरकर यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. दोन्ही दुचाकी गाड्यांचा चुराच झाला. आरोपी व त्याच्या प्रेयसीला कुठलीच दुखापत झाली नाही. मात्र निंभोरकर यांना जीव गमवावा लागला. घटनेची माहिती मिळताच आमदार सुमित वानखेडे व निंभोरकर परिवार घटनास्थळी पोहचला. त्यांनी माहिती घेतली.
घटनास्थळावरून पोलिसांनी आरोपीस घेत मोर्शी येथील रुग्णालयात तपासणी केली. नंतर पुढील उपचारासाठी अमरावतीस पाठविले. मात्र हे एक आरोपीस वाचविण्याचे नाटकच असल्याची चर्चा सूरू झाली. आरोपी हा एका पोलीस ठाणेदारचा नातेवाईक असल्याची बाब पुढे आली. म्हणून त्याचा बचाव मोर्शी ठाणेदार करीत असल्याचा आरोप झाल्याने गोंधळ उडाला. वातावरण तंग झाले.
ही माहिती मिळताच आमदार सुमित वानखेडे हे मोर्शी ठाण्यात पोहचले. माहिती घेतल्यावर ठाणेदाराची भूमिका त्यांना संशयास्पद वाटली. लगेच त्यांनी ठाणेदारास फैलावर घेतले. खरपूस भाषेत हजेरी घेतल्यावर मोर्शी ठाणेदारांनी आरोपी यश पवार विरोधात अखेर विविध चार गुन्हे दाखल केले. आरोपीस सांभाळून घेण्याचा प्रयत्न फसला.
मात्र या अपघाती मृत्यूने निंभोरकर कुटुंबास चांगलाच धक्का बसला आहे. मृत हेमंत निंभोरकर यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, भाऊ,पुतणे व मोठा आप्तपरिवार आहे. भाजप पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, गावकरी या दुःखात सहभागी झालेत.