दुसरा क्रमांक मुंबई उपनगर तर तिसऱ्या स्थानी रायगड
नागपूर : बांधकाम व्यावसायिकांनी वेळेत प्रकल्प पूर्ण न केल्याने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) यंदा राज्यातील तब्बल ४७० प्रकल्पांना मुदतबाह्य यादीत टाकले आहे. यामध्ये पुणे शहर क्रमांक एकवर असून मुंबई उपनगर दोन तर रायगड तिसऱ्या स्थानी आहे.
राज्य सरकारने २०१७ साली बांधकाम व्यावसायिकांवर अंकुश ठेवण्यासाठी तसेच त्यांच्याकडून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच महारेरा कायद्याची अंमलबजावणी केली. हा कायदा अंमलात आल्यापासून बांधकाम व्यावसायिक नव्याने सुरू करणाऱ्या प्रकल्पाच्या नोंदणीपासून तर प्रकल्प पूर्ण होण्यापर्यंतची कालमर्यादा ठरवून देत असतात. जसजसे काम पूर्ण होते तसे टप्प्याटप्प्याने त्याबाबतची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर टाकावी लागते. परंतु, मागच्या वर्षी महाराष्ट्रात करोनामुळे टाळेबंदी लागली आणि सर्व अर्थचक्र विस्कळीत झाले. त्याचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यावसायिकांना बसला. परिणामी, राज्यात १ हजार ६४ प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे ते महारेराच्या काळ्या यादीत गेले. मात्र यंदा करोनाची साथ ओसरली आणि अर्थचक्राला गती मिळाली. त्यामुळे वेळेत न पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली. यंदा राज्यात ४७० प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकले नाहीत. यात पुणे शहर क्रमांक एक वर आहे. पुण्यातील १२१ प्रकल्प मुदतीत तयार होऊ शकले नाही. मुंबई उपनगर दुसऱ्या स्थानी असून येथे ५२ प्रकल्प रखडले आहेत. रायगड जिल्हयात ४० प्रकल्प तसेच ठाण्यात ३८ प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण झाले नाहीत.