नागपूर: सीमा तपासणी नाका, कांद्री (मनसर) येथे कार्यरत असताना २०२३ मध्ये खासगी व्यक्तीकडून लाच घेणे आणि काही वर्षांपूर्वी बजाजनगर पोलीस ठाणे परिसरात सरकारी बंदुकीचा गैरवापर प्रकरणाचा ठपका ठेवत मोटार वाहन निरीक्षण (आरटीओ अधिकारी) गीता शेजवळ यांना परिवहन खात्याने शुक्रवारी निलंबित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीता शेजवळ या सुरुवातीपासूनच वादग्रस्त अधिकारी राहिल्या. २०१६ मध्ये त्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यरत होत्या. त्यावेळी शेजवळ यांना वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण प्रकरणात अनियमितता करताना पकडण्यात आले होते. या प्रकरणातच त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी झाली. दोन वर्षे निलंबित राहिल्यावर त्यांना शिक्षा म्हणून नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय शहर येथे बदली करण्यात आली. त्यांची सेवा नागपूर ग्रामीण येथील सीमा तपासणी नाका (कांद्री) येथे लावली गेली. येथेही त्यांनी खासगी व्यक्तीकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणातही त्यांच्यावर नागपूर ग्रामीणच्या रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. त्यानंतर बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीत संकेत गायकवाड या मोटार वाहन निरीक्षकावर त्याच्या घरात गोळी झाडण्यात आली. पोलिसांनी सूक्ष्म तपास करत या प्रकरणात गीता शेजवळ, संकेत गायकवाडसह इतरांवर संशय उपस्थित केला. या प्रकरणात शेजवळ यांनी सरकारी बंदुकीचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटन सचिव नूतन रेवतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गीता शेजवळ हिचा भाऊ मुख्यमंत्र्यांसोबतचे छायाचित्र वापरत आरटीओ अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याची तक्रार दिली होती. शेजवळ यांनी तीन आरटीओ अधिकाऱ्यांविरुद्ध नाहक तक्रार दिली असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही कळवले होते. त्याची दखल घेत हे निलंबन आदेश आल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा >>>जुन्या निवृत्तीवेतनाचा लाभ केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाच, वित्त विभागाची हायकोर्टात माहिती…

संकेत गायकवाडचेही निलंबन

बजाजनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ५ मे २०२२ ला मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला होता. गीता शेजवळ यांनी संकेतवर गोळी झाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी शेजवळवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा तर संकेत गायकवाड यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात संकेत गायकवाड यांनाही परिवहन आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी निलंबित केले.

शेजवळ, गायकवाड यांना न्यायालयातून दिलासा

गीता शेजवळ व संकेत गायकवाड यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. दोन्ही आरोपींच्या विरोधात पुढील आदेशापर्यंत आरोपपत्र दाखल करू नका, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. यादरम्यान प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी पोलीस स्वतंत्र असल्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. बजाजनगर पोलिसांनी जानेवारीमध्ये शेजवळ व गायकवाडविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्या वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शेजवळ सध्या अहमदनगर तर गायकवाड पिंपरी- चिंचवड येथे कार्यरत आहेत. आरोपींतर्फे ॲड. शशांक मनोहर आणि ॲड. समीर सोनवणे यांनी बाजू मांडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motor vehicle inspector rto officer geeta shey was suspended by the transport department on friday nagpur mnb 82 amy
First published on: 17-02-2024 at 13:45 IST