वर्धा : सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वत्र नापिकीचे चित्र दिसून येत असल्याचे म्हटल्या जाते. जून, जुले, सप्टेंबर पावसाने चिंब करून गेले असतांनाच आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पण पाऊस उरले सुरले पिक भिजवून गेला. दिवाळी उंबरठ्यावर पण पिकच नाही तर खायचे काय, असे विचारले जात आहे. पिकांची नासाडी झाल्याने शेतात ते पिक पेटवून देण्याच्या घटना घडत आहे. सर्व शेतकरी संघटना त्वरित नुकसानभरपाईसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तर आता खासदार अमर काळे यांनीही निर्वाणीचा ईशारा सरकारला दिला आहे.

खासदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देत ईशारा दिला.अतिवृष्टी, येलो मोझॅक, आणि शासनाच्या उदासीन धोरणांमुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने आठ एकर क्षेत्रावरील आपल्या सोयाबीन पिकाला आग लावून दिल्याची घटना ताजी आहे. समुद्रपूर तालुक्यातील उमरी येथील रूमदेव ठेंगणे यांनी त्यांच्या आठ एकर शेतातील सोयाबीन पेटवून दिले. उत्पन्न काहीच नाही म्हणून माल जमा ठेऊन काय करणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांनी ही कृती निषेध म्हणून केली आहे, असं मला वाटतं. शेतकरी हताश झाला आहे.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. येलो मोझॅकसारख्या आजारांनीही पिके बेचिराख झाली आहेत. एवढं सगळं असूनही सरकारकडून कोणतीही भरीव मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

ते पुढे म्हणाले, सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करत आहे – रस्ते, शक्तिपीठे, मोठे प्रकल्प याकडे लक्ष दिलं जातंय. पण सध्या सगळ्यात मोठी गरज आहे ती शेतकऱ्याला आधार देण्याची. हे सर्व बाजूला ठेवा आणि आधी शेतकऱ्याचं आयुष्य वाचवा.अमर काळेंनी सरकारला थेट इशारा दिला की,जर सरकारने त्वरित आणि ठोस मदत केली नाही, तर यापुढे परिस्थिती हाताबाहेर जाईल. शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो, आणि पुढच्या काळात मंत्री किंवा मुख्यमंत्री यांना रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही.

शेवटी, त्यांनी शासनाला आवाहन केलं की, लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी, अन्यथा परिणाम गंभीर होतील. सरकारने शेतकऱ्यांसाठी त्वरित मदतीचे पाऊल उचलले पाहिजे.शेतकऱ्याच्या आत्मदाहासारख्या कृतीमागे सरकारच्या असंवेदनशील धोरणांचा निषेध असल्याचं खासदार अमर काळे म्हणतात. त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडे तात्काळ आणि ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे, अन्यथा जनआक्रोश वाढण्याचा इशाराही दिला आहे. पावसाने केलेले थैमान होत्याचे नव्हते करणारे ठरले आहे. शेतकरी एक तर संतप्त आहे किंवा तो निराशेत सापडला आहे. हे चित्र चांगले नाही. ग्रामीण भागात याचा उद्रेक होवू शकतो. म्हणून मदत त्वरित करा, असे सरकारला स्पष्ट सांगणे असल्याचे खासदार काळे म्हणतात.