वर्धा : वर्धा जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात उठलेले वादळ रहस्यमय ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी पक्षात येत या पक्षातर्फे खासदार झालेले अमर काळे यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेण्यात आले. मामा – भाचे म्हणजे खासदार अमर काळे व त्यांचे मामा माजी मंत्री अनिल देशमुख हेच कट करस्थानी असल्याची टीका पवारनिष्ठ सहकार गटाने केली होती.

जिल्हाध्यक्ष पदावर अतुल वांदिले यांची नियुक्ती ही याच दोघांच्या कटाचा भाग असल्याचा आरोप पण झाला. पुढे सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या स्थपनेपासूनच नव्हे तर पवार यांच्या राजकारणास सदैव साथ देणारा गट म्हणून ओळख राहल्याचे प्रा. देशमुख म्हणाले होते. पण असा अनुभव दुःखद अशी भावना त्यांनी व्यक्त करीत वेगळा निर्णय घेण्याचे सुतोवाच केले.

या नंतर चार दिवसापूर्वी या सहकार गटाने दिवाळी मित्र संमेलन आयोजित करीत नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांच्या पक्षात नेमके चालले काय, अशी चर्चा सूरू आहे. या पार्श्वभूमीवर रहस्य कोंडी फोडतांना खासदार काळे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणतात की नाराजी हा भाग वेगळा. सहकार गट महत्वाचा. म्हणून मी त्यांचे दिवाळी संमेलन झाले त्याच रात्री सुरेशभाऊ व समीर यांची रात्री भेट घेतली. त्यांना माझी भूमिका सांगितली. हेच मी कुठेही सांगणार. तुम्ही दोघे व मी असे तिघेच माननीय शरद पवार यांना भेटू. नाराजी काय हे तुम्ही माझ्या समक्ष सांगू शकता. भेटीची वेळ मी घेतो. असे भाऊ व समिरला सांगितले. ते तयार पण झाले. माझ्यावर नाराजी नसणार, अशी माझी अपेक्षा ठेवतो. शरद पवार यांना भेटायला आम्ही तिघे जाणार, हे निश्चित अशी खात्री खासदार काळे यांनी लोकसत्ता सोबत बोलतांना दिली आहे.

खुद्द खासदार हे नाराजी दूर करण्यात पुढाकार घेत असल्याची बाब जिल्हा राजकारणात आश्चर्यांची ठरणार. एका तर जिल्हाध्यक्ष नेमण्यात त्यांची काहीच खेळी नाही, हे त्यांनी यनिमित्याने स्पष्ट करून टाकले. दुसरी बाब म्हणजे मीच कश्याला एकटेच पक्षाची जबाबदारी पार पाडू. तिसरी बाब म्हणजे सहकार गट विविध पक्षात विखूरला असतांना गट नेता मात्र अद्याप शरद पवार यांना धरून आहे. म्हणजे प्रा. सुरेश देशमुख यांना नाराज नं करता पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न हे खुद्द शरद पवार यांनाही रुचेल. असा मन्सू्बा खासदार काळे ठेवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळत आहे. मात्र आरा खा. काळे, सुरेश देशमुख व जाहीर नाराजी व्यक्त करणारे समीर देशमुख यांचे शिष्टमंडळ केव्हा शरद पवार यांना भेटणार व काय निचोड निघणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार.