लोकसत्ता टीम

नागपूर: नागपुरात होणारी महाविकास आघाडीची सभा संभाजीनगरपेक्षा जबरदस्त होणार असून महाविकास आघाडीची ताकद या सभेच्या माध्यमातून दिसणार आहे. त्यामुळे सभेपूर्वीच अनेकांच्या पोटात गोळा उठलेला आहे. कितीही काळ्या मांजरी आडव्या आणल्या तरी नागपुरातील सभा होणारच. ही सभा राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देणारी ठरणार असल्याचे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेचे नेते विनायक राऊत मंगळवारी रात्री महाविकास आघाडीच्या सभेच्या निमित्ताने नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. संभाजीनगरच्या सभेमुळे भाजप घाबरलेला असून उपराजधानीतील सभा होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. संभाजीनगरची सभा होऊ नये म्हणून तिथे जातीय दंगल घडवण्यात आली. नागपुरात महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर त्यांना धक्का बसणार असल्याने सभेला विरोध करत नौटंकी सुरू आहे. अपशकून निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. सभेच्या दिवशी किमान या मैदानावर ७० हजारांच्यावर जनसमुदाय राहील. आजूबाजूचा परिसर पाहता एक लाखाची सभा या मैदानावर होईल, असेही राऊत म्हणाले.

आणखी वाचा- ‘ज्यांना पालक शब्दाचा अर्थच कळत नाही, त्या बालकाबद्दल…’, खा. अरविंद सावंतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान

महाविकास आघाडीत कुठलीही बिघाडी नाही. चर्चा करणारे हे मिंधे गट आणि भाजप आहेत. आज आम्ही एकोप्याने महाराष्ट्रात आहोत. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांचे विचार आम्ही आदराने स्वीकारतो. महाविकास आघाडी तुटली असे काही नाही. आघाडी तुटावी यासाठी भाजप व मिंधे गट देव पाण्यात ठेवून बसलेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रकांत पाटलांना सत्तेची मस्ती आलेली आहे. त्यामुळे असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनीच याबाबत उत्तर दिले पाहिजे. बाळासाहेबांचे नाव घेऊन तुम्ही राजकारण करत आहात. बाळासाहेबांचा अपमान केल्यानंतर त्याचे उत्तर शिंदे यांनी दिले पाहिजे. त्यांनी उत्तर न दिल्यास इतका लाचार मुख्यमंत्री कधी झालाच नाही, असे महाराष्ट्रातील जनता म्हणेल, असेही खासदार विनायक राऊत म्हणाले.