नागपूर : राज्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी लक्षात घेता राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विनंती करून २८ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ पुढे ढकलण्याची विनंती केली होती. यानुसार एमपीएससीने २८ सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली असून ती आता नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. मात्र एमपीएससीने इतका महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला तरी राज्यातील बार्टी, सारथी, महाजोती, टीआरटीआय या संस्थांनी मात्र अद्यापही त्यांच्या यूपीएससी आणि अन्न परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी घेतली जाणारी सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलेल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष वाढत चाललेला आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने थैमान घातले असल्याने या संस्थांनी तात्काळ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

नेमका गोंधळ काय ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) धर्तीवर राज्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थांकडून एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे व इतर स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. खासगी संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. समान धोरणापूर्वी बार्टी, सारथी, महाज्योती आपल्या पातळीवरच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करत होते. परंतु समान धोरणामुळे ही व्यवस्था संपुष्टात आली. प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी व संनियंत्रणाची जबाबदारी ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांच्याकडे आहे. त्यामुळे ‘बार्टी’ला सर्व संस्थांमधील विद्यार्थी निवडीसाठी परीक्षा घ्यायची आहे.

सामायिक प्रवेश परीक्षांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून त्या त्या संस्थानुसार घेण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यानुसार सामायिक प्रवेश परीक्षा १४/०९/२०२५ ते २७/०९/२०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचे वेळापत्रक जाहीर करून अनेक परीक्षा झाल्या. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी घेतले जाणारे सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता २९ आणि ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. अद्यापही अनेक भागातील पूर परिस्थिती सावरलेली नाही. तर राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. हीच बाब लक्षात घेऊन एमपीएससीने त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासोबतच वैद्यकीय व औषध द्रव्य विभागानेही त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या. असे असतानाही बार्टी, सारथी आणि महाज्योतीकडून अद्यापही परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

परीक्षा केंद्रांचा गोंधळ ?

बार्टीकडून विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या सामायिक परीक्षेचे केंद्र हे जिल्ह्याचे ठिकाण सोडून अन्य दूर देण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना गोंदिया, भंडारा असे विदर्भातील केंद्र देण्यात आले. तर विदर्भातील विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील केंद्र देण्यात आले होते. केवळ प्रवेश परीक्षेसाठी इतक्या दूर जाणे अशक्य असल्याने केवळ काहीच विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्याची माहिती आहे. यूपीएससीच्या परीक्षामध्येही हाच गोंधळ उडाला असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.