नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अनेक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तुम्ही शिकवणी लावली असेल तर ही जाहिरात तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रिक संयुक्त सेवा पूर्व परीक्षा २०२५ ची ही जाहिरात आहे. २८२ पदांसाठी ही जाहिरात असून ९ नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे. या परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती पाहूया..
एमपीएससीकडून अनेक महिन्यांनतर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यात सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि अन्य पदांचा समावेश आहे. त्यामुळे ही जाहिरात फार महत्त्वाची आहे. या परीक्षेचे तीन टप्प राहत असून त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेसाठी १ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. २१ ऑगस्टपर्यंतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे.
पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी:-
- पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
- प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केली आहेत. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणा-या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे संवर्ग पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित/अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील पूर्व परीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
- जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणा-या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
- पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.
- पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित/अतिरिक्त/स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धिपत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही.
- भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक/समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाकडून प्राप्त संबंधित मागणीपत्रानुसार आहे. तसेच, वर नमूद पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/वाढ होऊ शकेल.
- पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबावलची घोषणा/सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
- विविध सामाजिक प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, दिव्यांग व अनाथ इत्यार्थीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील,
- महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवगांतील महिलांसाठी नॉन-क्रिमिलेअरमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.