नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांची बदली करण्यात आली. त्यानंतर या पदाची धुरा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आली आहे. मुख्य अपर सचिव व्हि राधा यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून कायमस्वरूपी सचिव मिळेपर्यंत सौरभ कटियार यांच्याकडे सचिव पदाचा अतिरिक्त प्रभाव राहणार आहे.

डॉ. सुवर्णा खरात यांची तीन वर्षांआधी त्यांची एमपीएससीच्या सचिव पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची अचानक बदली करण्यात आली. त्यानंतर एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही एमपीएससीला नियमित सचिव मिळालेला नाही. याचा परिणाम एमपीएससीच्या परीक्षा, निकाल आणि इतर गोष्टींवर पडत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमपीएससीमध्ये सचिव पदासाठी सरकार दरबारी लॉबींग सुरू आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही एक भारतीय राज्यघटनेवर आधारित घटनात्मक संस्था आहे, जी महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवा व पदांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करून पात्र उमेदवारांची निवड करते. ही संस्था भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ नुसार स्थापन झाली आहे. गुणवत्तेनुसार व आरक्षणाच्या नियमांनुसार भरती करते.

एमपीएससी विविध राज्याच्या सेवा जसे की महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा आणि महाराष्ट्र वन सेवांसाठी परीक्षा आयोजित करते. एमपीएससीमध्ये सचिव हे प्रशासकीय महत्त्वाचे पद आहे. या पदावर तीन वर्षांआधी डॉ. खरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ हा चांगलाच वादग्रस्त ठरला होता. खरात यांच्या निवडीनंतर एमपीएससीच्या विविध परीक्षा आणि निकाल रखडल्याचा आरोपही अनेकदा झाला आहे.

मात्र, मराठा आरक्षणामुळे विविध परीक्षांच्या जाहिराती पुन्हा नव्याने तयार करण्यात आल्या. यामध्ये मराठा आरक्षणही लागू करण्यात आल्याने परीक्षा आणि निकालाला विलंब झाला होता. मात्र, या काळात डॉ. खरात यांच्यामुळे परीक्षांना विलंब होत असल्याचा आरोपही झाला होता. अखेर १९ सप्टेंबरला त्यांची कौशल्य विकास विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या सचिव पदावर नियमित कोण येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सचिव पदाचा प्रभार देताना नियम काय?

कुठल्याही शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याचा प्रभाव दुसऱ्यावर सोपवण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये एक शासन निर्णय काढण्यात आला होता.यात सविस्तर माहिती दिले देण्यात आलेली आहे मात्र, एमपीएससीच्या सचिव पदाचा प्रभार देताना हे नियम डावलण्यात आल्याचा आरोप आहे.महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ५६ नुसार शासकीय कर्मचाऱ्यांकडे त्याच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येतो.

असा हा दुसऱ्या रिक्त असलेल्या पदाचा अतिरिक्त कार्यभार, एकाच प्रशासकीय विभागांतर्गत, प्रशासकीय सोय व निकड लक्षात घेवून शक्यतो त्याच कार्यालयातील, त्याच संवर्गातील सर्वात सेवाजेष्ठ, अनुभवी व कार्यक्षम अधिकारी/कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात यावा. जेथे असे अधिकारी/कर्मचारी उपलब्ध नसतील तेथे संबंधित पदाला लगत असलेल्या निम्न संवर्गातील सर्वात जेष्ठ अधिकारी/कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा. हा नियम असतानाही आयोगातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना डावलून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सचिव पदाचा प्रभार देण्यात आला आहे.