कोराडी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात आधी राखेच्या गळतीने गावकऱ्यांनी झोप उडवली. आता त्याच परिसरात एक नव्हे तर तीन-तीन बिबट्यांनी शिरकाव करुन केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे.

नागपूर आता बिबट्याची सवय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी अंबाझरी परिसरातून आलेल्या बिबट्याने संपूर्ण शहर पिंजून काढले आणि तो आल्यापावली परतही गेला. मात्र, या आठ दिवसात नागपूरकरांमध्ये दहशत होती. शहरातील वाडी, दाभा येथील त्याचा फेरफटका नित्याचाच झाला आहे. आता त्याने आपला मोर्चा थेट कोराडी औष्णिक विद्युत केंद्राकडे वळवला आहे. केंद्राच्या कोराडी परिसरातील ’सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात तो कैद झाला.

याआधीही तो परिसरात येऊन गेला, पण यावेळी त्याचा मुक्काम वाढला. गेल्या आठ दिवसांपासून कोराडी परिसरात कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याने दर्शन दिले. वनखात्याची सेमिनरी हिल्स व ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राची चमू घटनास्थळी पोहोचली. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात देखील बिबटे दिसून आले. वनखात्याने या परिसरात कॅमेरा ‘ट्रॅप’ लावले असून केंद्राच्या व्यवस्थापनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
कोराडी येथे रात्रपाळीत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगार यांना कार्यस्थळापर्यंत ने-आण करण्यासाठी दोन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने वनखात्याने दिलेल्या सूचना संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगारांना देण्यात आल्या आहेत.

गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार –

जंगलात गुरे चारावयास गेलेल्या महिलेस वाघाने ठार केल्याची घटना आज सायंकाळी गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत चुरचुरा गावात घडली. पार्वताबाई नारायण चौधरी (५५, रा.चुरचुरा), असे मृत महिलेचे नाव आहे. पार्वताबाई आज सकाळी आपल्या पतीसह गुरे चारावयास जंगलात गेल्या होत्या. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास गावाकडे परत येताना पार्वताबाईंवर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही पत्नी दिसत नसल्याने नारायण चौधरी मागे फिरले असता त्यांना वाघाने कुणालातरी ओढत नेल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर गावकरी धावून आले. जंगलात शोध घेतला असता पार्वताबाईचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. मडावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पार्वताबाईच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. आतापर्यंत पोर्ला वनपरिक्षेत्रात वाघांनी ९ जणांना ठार केले आहे. वाघाच्या हल्ल्यांमुळे नागरिकांत प्रचंड दहशत आहे.