नागपूर : कर्जमाफी नाही, शेतमालास भाव, नैसर्गिक आपत्ती नंतर मदत नाही आणि आता पेरणीच्या हंगामात खतांचा तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. पेरणी हंगाम जवळ येवून सुध्दा आवश्यक असलेली खते बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
एकीकडे शेतकरी शेतात राबराब राबुन उत्पादन घेतो. नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान होवून त्याला मदत मिळत नाही. जो शेतमाल तो बाजारात आणतो त्याला मातीमोल भाव मिळत असल्याने साधा उत्पादन खर्चही निघत नाही. यामुळे त्याच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जाहीर सभेत सत्ता आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. सत्ता येवून सात महिने झाले परंतु यावर कोणताही निर्णय झाला नाही. आता खरीपाच्या पेरणीसाठी लागणारे खते बाजारात नसल्याने शेतकऱ्यांसमोर नविन संकट उभे ठाकले आहे. राज्यात डि.ए.पी. सह युरीया व इतर मिश्रखतांना मोठया प्रमाणात तुटवडा असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
डि.ए.पी. सोबत युरीया व इतर मिश्र खतांची शेतपीकांना आवश्यकता असते. परंतु राज्यात याच खतांचा मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यात सर्वांत जास्त मागणी ही डि.ए.पी. या खतांची आहे. परंतु हेच खत बाजारात नसल्याचे चित्र राज्यभर आहे. विदर्भाचा विचार केला तर मागणीच्या तुलनेत केवळ २० ते ३० टक्केचा पुरवठा हा डि.ए.पी.चा पुरवठा आजपर्यत झाला आहे. गडचिरोली, भंडारा, गोदिंया, चंद्रपुर या जिल्हात धान पिकासाठी युरीयाची मागणी मोठया प्रमाणात असते. येथेही आतापर्यत मागणीच्या तुलनेत केवळ ३० ते ३५ टक्केच युरीयाचा पुरवठा झाला आहे. मिश्र खतांच्या बाबतीच सुध्दा हिच परिस्थीती आहे. केवळ विदर्भाच्या आकडेवारीचा विचार केला तर मागणीच्या तुलनेत ३० ते ४० टक्केच मिश्र खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. पाउस लांबनीवर पडल्याने पेरणीला उशीर झाला. येता काही दिवसात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बाजारात खते घेण्यासाठी जात आहे. परंतु खतांचा साठाच नसल्याने त्यांच्यापदरी निराशा पडत आहे. आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना खते मिळत नसल्याचे त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.
विदर्भातील डि.ए.पी.ची आजची स्थिती (आकडे मेट्रीक टनामध्ये)
जिल्हा – मागणी – पुरवठा
नागपूर – २३,२५२ – ८,९४०
अमरावती – २१,२४४ – ५,८४८
बुलढाणा – २५,१०० – १०,५१८
यवतमाळ – २२,०८० – ३,८२०
भंडारा – ५,५०० – १,२४२
चंद्रपुर – १७,९०० – ४,५३४
गडचिरोली – ५,२३० – ५४१
अकोला – १५,००० – ५,५१०
गोंदिया – ४,६९० – ५०९
मिश्र खताच्या किंमतीत वाढ
मिश्र खतांच्या किंमतीमध्ये मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांला दिलासा देण्याचे सोडुन खताच्या किंमतीमध्ये वाढ करुन उत्पादन खर्चात आणखी वाढ करण्यात आली आहे.