नागपूर : पोलीसांची फौज गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी व्यस्त असताना पाटणकर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून ८ लाख १२ हजारांची रोकड पळविणाऱ्या टोळीचा बुरखा फाडण्यात जरिपटका पोलिसांना बुधवारी यश आले. उत्तर प्रदेशातील या टोळीच्या म्होरक्याचा तांत्रिक तपासाच्या आधारे छडा लावत पोलिसांनी त्याला यशोधरा नगरातल्या निर्माणाधानी घराच्या भूखंडावरून ताब्यात घेतले. नातेवाईक असलेल्या आणखी चार जणांच्या मदतीने आपणच पाटणकर चौकातले एटीएम फोडून चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे.
खुर्शिद अहमद निसार अहमद (५५) असे एटीएम फोडणाऱ्या टोळीच्या मास्टरमाईंडचे नाव आहे. खुर्शिद विरोधात यापूर्वीही जबरी चोरी, दरोडा, लूटमारीचे २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबई आणि ठाणे परिसरात त्याने यापूर्वीही गुन्हेगारी स्वुराचे कृत्य केले आहे. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्यात तरबेज असलेली ही टोळी उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढ जिल्ह्यातील मनेहू येथील आहे. टोळीने यापूर्वीही देशातल्या विविध भागांमध्ये एटीएम फोडले असण्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेनेही शोध घेत आहेत.
जरिपटका पोलिसांच्या हाती लागलेला टोळीचा मास्टरमाईंड खुर्शिद अहमद हा गेल्या काही वर्षांपासून नागपुरात रहात आहे. त्याने चोरी- दरोड्यातून कमावलेल्या पैशातून यशोधरानगरात एक भुखंडही विकत घेतला आहे. आपसांत नातेवाईक असलेल्या या टोळीसाठी खुर्शिदने पाटणकर चौकातील एटीएमची रेकी केली होती. तीन महिन्यांपासून बंद असलेले एस.बी. आय. बँकेचे हे एटीएम अलिकडेच सुरू करण्यात आले होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती खुर्शिदनेच टोळीतील अन्य सदस्यांना पुरवली होती. त्या आधारे उत्तर प्रदेशातून आलेली ही टोळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून नागपुरात आली.
इथे आल्यानंतर टोळीने ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवलेल्या कारचे नंबर तपासले. यापैकी एका नंबरची बनावट पाटी तयार करून या टोळीने ४ सप्टेंबरला पहाटे अडिचच्या सुमारास पाटणकर चौकातले एटीएम गॅसकटरच्या सहाय्याने कापले. मशीनमधील रोख ८ लाख १२ हजार पळवत चोरांनी रातोरात उत्तर प्रदेशकडे पलायन केले.
त्याचा उलगडा करताना पोलिसांनी घटनेच्या वेळी परिसरातले मोबाईल क्रमांक आणि शहरासह जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या मार्गांवरील ३५० हून अधिक सीसीटीव्ही तपासले. त्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास करीत यशोधरानगरातून खुर्शिद अहमदला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. पोलिसांनी बाजीराव दाखवताच त्याने पाटणकर चौकातले एटीएम फोडल्याचे कबूल करीत एटीएममधून पळवलेल्या रोख रकमेपैकी १७ हजार ४०० रुपये पोलिसांच्या हवाली केले. नोटांचे क्रमांक तपासत पोलिसांनी एटीएमधून चोरीला गेलेल्या नोंटांची खात्री केली.
काय म्हणाले पोलीस उपायुक्त….
उत्तर प्रदेशातील ही टोळी निर्मनुष्य एटीएमची रेकी करून गॅस कटरच्या सहार्याने चोरी करते. टोळे सदस्य असलेले हे सगळे आपसांत नातेवाईक आहेत. त्यांनी आणखी काही एटीएम फोडले असल्यास निश्चितपणे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. त्या दिशेने पोलिस शोध घेत आहेत. पोलीस पथक फरार चौघांच्या मागावर आहेत. लकरच त्यांच्याही मुसक्या बांधल्या जातील. -निकेतन कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ- ५