सर्वाधिक प्रवासी दर ६० ते ६५ टक्केच; विदर्भ-छत्तीसगड दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या फारशी नसल्याचा परिणाम

राजेश्वर ठाकरे

देशात सध्या १० वंदे भारत एक्सप्रेस वेगवेगळय़ा शहरादरम्यान धावत असून या गाडय़ांची लोकप्रियताही कमालीची वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याला नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस अपवाद ठरत आहे. या गाडीला ५५ टक्क्यांच्या आसपासच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपुरात वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या गाडीत चेअर कार आहेत. सुमारे ४१३ किलोमीटरचे अंतर ती साडेपाच तासात कापते. त्यामुळे या गाडीची लोकप्रियतादेखील वाढेल, अशी अपेक्षा होती. पण रविवार, सोमवार आणि शुक्रवार वगळता या गाडीला अत्यल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येते. या गाडीचा अधिकतम प्रवासी दर ६० ते ६५ टक्के आहे आणि सरासरी ५५ टक्के आहे. या गाडीला प्रतिसाद कमी प्रतिसाद मिळत असल्याबद्दल रेल्वे प्रशासनाने अभ्यास केला असून काही उपाययोजना देखील सुचवल्या आहेत. विदर्भ आणि छत्तीसगड दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या फारशी नाही.

औषधोपचार आणि शिक्षण घेण्यासाठी रायपूरहून नागपूरला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे प्रवासी दररोज ये-जा करीत नाहीत. या दोन्ही शहरादरम्यान नोकरी, व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्याही फार नाही. त्याचा परिणाम गाडीला आवश्यक तेवढे प्रवासी मिळू शकत नसल्याचा निष्कर्ष रेल्वेच्या वाणिज्य विभागाने काढला आहे. या गाडीचे तिकीट भाडे ‘एसी थ्री टायर’चे जेवढे भाडे आहे तेवढे आहे. त्यामुळे अधिक भाडे असल्याने प्रवाशांची संख्या कमी आहे, हा मुद्दा गैरलागू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर या गाडीच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्याबाबत विचार सुरू आहे. नागपूरहून ही गाडी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी सुटते आणि बिलासपूरला सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर बिलासपूरहून रात्री सव्वा वाजता निघते आणि नागपूरला सकाळी पावणेसात वाजता पोहचते. या गाडीच्या वेळेत बदल करण्याबाबत विचार सुरू असल्याचे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक रविशकुमार सिंह यांनी सांगितले. सर्वात कमी प्रवासी वंदे भारत एक्सप्रेस दिवसेंदिवस देशात लोकप्रिय होत असल्याने मागणीही वाढत आहे. अनेक खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात वंदे भारत ट्रेन उपलब्ध करून देण्याची विनंती रेल्वे विभागाला केली आहे. दरम्यान, सध्या कार्यरत असलेल्या १० वंदे भारत गाडय़ांपैकी बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये या आर्थिक वर्षांत जानेवारीपर्यंत सर्वात कमी प्रवासी आहेत. मुंबई-गांधीनगर मार्ग हा सर्वाधिक प्रवासी (१२६ टक्के) असलेला मार्ग असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.