नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अखत्यारित असलेल्या स्वतंत्र कॅन्सर रुग्णालयाचे बांधकाम निधीअभावी संबंधित कंत्राटदाराकडून थांबण्याचे संकेत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)कडून प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे पुन्हा कॅन्सर रुग्णालयाचे काम रखडण्याचा धोका आहे. रुग्णालयाचे काम लांबल्यास कर्करुग्णांना अद्यावत उपचार लांबणार आहे.

देशातील सर्वाधिक मुख कर्करुग्ण नागपूरसह विदर्भात नोंदवले जातात. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूटची मागणी पुढे आली होती. २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा केली. फडणवीस मुख्यमंत्री असताना ही संस्था औरंगाबादला पळवली गेली. परंतु, त्यानंतर फडणवीसांनी नागपुरात स्वतंत्र कॅन्सर रुग्णालयाची घोषणा केली.

कॅन्सर रुग्णालयासाठी प्रथम २० कोटी व त्यानंतर ७.६१ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीच्या जोरावर मेडिकल परिसरात तीन माळ्याच्या अद्ययावत इमारतीचे काम मे. डी.व्ही. पटेल ॲन्ड कंपनीकडून केले जात आहे. संबंधित कंपनीकडून एनएमआरडीएला पत्र देत उपलब्ध निधीच्या तुलनेत १० ते १२ कोटी रुपयांचे अतिरिक्त काम झाल्याचे सांगत तातडीने निधी देण्याची मागणी केली गेली आहे. निधी न मिळाल्यास काम थांबवण्याचा इशाराही दिला गेला आहे. त्यानंतर एनएमआरडीएकडून संबंधित कंत्राटदाराकडून या पद्धतीचे पत्र मिळाले असून त्यांना निधी न दिल्यास काम संथ होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या कॅन्सर रुग्णालयाचे बांधकाम लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, संबधित कंत्राटदाराकडून निधीसाठी काम थांबवण्याचा इशारा देणारे पत्र मिळाल्याच्या वृत्ताला एनएमआरडीएचे अधिकारी संजय चिमुरकर यांनी दुजोरा दिला. सोबत त्यांनी निधीच्या मागणीसाठी शासनासह मेडिकलच्या अधिष्ठात्यांनाही पत्र दिल्याची माहिती दिली.

७६ कोटींचा प्रकल्प

नागपुरातील तीन माळ्याचे कॅन्सर रुग्णालयाचा प्रकल्प ७६ कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी प्रथम २० कोटी व त्यांतर दुसऱ्या टप्यात ७.६१ कोटी रुपयांचा निधी एनएमआरडीए मार्फत संबंधित कंत्राटदाराला शासनाकडून दिला गेला आहे. आता शिल्लक असलेल्या सुमारे ४५ कोटी रुपयांची मागणी एनएमआरडीएकडून शासनाला केली जात आहे. हा निधी कधी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुद्दा निघाल्यावरही तोडगा नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेडिकल रुग्णालयात एक आढावा बैठक घेतली होती. त्याला वैद्यकीय सचिवांसह नागपूरचे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी हजर होते. यावेळीही कॅन्सर रुग्णालयाच्या बांधकामासाठी आणखी निधीची मागणी कंत्राटदाराकडून होत असल्याचे पुढे आले होते. परंतु, त्यावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.